'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'नंतर मोठा धमाका, आर्यन खानच्या तिसऱ्या प्रोजेक्टमध्ये किंग खान करणार काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 16:42 IST2025-11-07T16:42:12+5:302025-11-07T16:42:54+5:30
Shah Rukh Khan And Aryan Khan : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या सीरीजद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले आणि धुमाकूळ घातला. या सीरीजनंतर आर्यन लवकरच एका प्रोजेक्टसह मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.

'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'नंतर मोठा धमाका, आर्यन खानच्या तिसऱ्या प्रोजेक्टमध्ये किंग खान करणार काम
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या सीरीजद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले आणि धुमाकूळ घातला. या सीरीजनंतर आर्यन लवकरच एका प्रोजेक्टसह मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. याच दरम्यान आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरंतर आर्यन त्याच्या तिसऱ्या प्रोजेक्टसाठीही सज्ज आहे. विशेष म्हणजे यात तो त्याचे वडील म्हणजेच किंग शाहरुख खानला डायरेक्ट करणार आहे.
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, आर्यन खानच्या तिसऱ्या प्रोजेक्टमध्ये त्याचे वडील शाहरुख खान मुख्य भूमिकेत असतील. या प्रोजेक्टशी संबंधित सूत्रांनी सांगितले, "आर्यन खानला त्याच्या सुपरस्टार वडिलांना दिग्दर्शन करण्याचं आव्हान स्वीकारण्यापूर्वी मोठ्या पडद्यावर एक यशस्वी चित्रपट द्यायचा आहे, जेणेकरून तो एक चित्रपट निर्माता म्हणून स्वतःला सिद्ध करू शकेल. त्याला वाटतं की त्याचं कामच त्याच्यासाठी बोललं पाहिजे."
कधी येणार आर्यन आणि शाहरुखचा प्रोजेक्ट?
सूत्रांनुसार, आर्यन खानचा वडील शाहरुख खानसोबतचा हा प्रोजेक्ट २०२७ मध्ये येईल. या वृत्ताने सोशल मीडियावर खळबळ माजवली असून चाहते या दोघांच्या या प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, सध्या आर्यन त्याच्या दुसऱ्या चित्रपटाची स्क्रीप्ट पूर्ण करणे आणि कास्टिंग सुरू करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.
'किंग'मध्ये दिसणार शाहरुख खान
शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, अभिनेता शेवटचा तापसी पन्नू आणि विकी कौशलसोबत 'डंकी'मध्ये दिसला होता, जो २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. सध्या अभिनेता 'किंग'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात त्याच्यासोबत त्याची मुलगी सुहाना खान देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून अभिनेत्याचा फर्स्ट लूक त्याच्या वाढदिवशी म्हणजेच २ नोव्हेंबरला प्रदर्शित करण्यात आला होता.