कार्तिक आर्यन म्हणणार हरे राम, हरे राम….हरे कृष्णा, Bhul bhulaiyaa 2 चित्रपटाचं पोस्टर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 13:13 IST2019-08-19T13:05:23+5:302019-08-19T13:13:24+5:30
Bhool Bhulaiyaa 2's Poster: या पोस्टरवर तरी कार्तिकच्या लूकमध्ये जास्त बदल करण्यात आला नाही. त्यामुळे रुपेरी पडद्यावर कार्तिक अक्षयसारखी जादू दाखवणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे.

कार्तिक आर्यन म्हणणार हरे राम, हरे राम….हरे कृष्णा, Bhul bhulaiyaa 2 चित्रपटाचं पोस्टर रिलीज
अभिनेता अक्षय कुमार आणि विद्या बालन यांची प्रमुख भूमिका असलेला 'भूल भुलैय्या' हा चित्रपट २००७ साली रुपेरी पडद्यावर झळकला होता. अक्षय, विद्याचा अभिनय, चित्रपटाची कथा आणि संगीत यामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. रसिकांना हा चित्रपट भावला होता. त्यामुळेच या चित्रपटाचा सिक्वेल येणार का याची उत्सुकता लागली होती. अखेर रसिकांची उत्कंठा आणि प्रतीक्षा संपली आहे.
'भूल भुलैय्या २' या चित्रपटाचा फर्स्ट लूक अखेर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे पोस्टर समोर आलं असून यांत अभिनेता कार्तिक आर्यन पाहायला मिळत आहे. यांत कार्तिक हा अभिनेता अक्षय कुमारने साकारलेल्या भूमिकेत दिसत आहे. मात्र या पोस्टरवर कार्तिकला ओळखणंही कठीण आहे. कार्तिक हुबेहूब अक्षय कुमारच्या स्टाइलमध्ये दिसत आहे.
पिवळ्या रंगाचे धोतर आणि कुर्त्यामध्ये कार्तिक दिसत असून त्यावर त्यानं रुद्राक्ष माळा आणि ब्रेसलेट घातलं आहे. तसेच डोक्याला पिवळ्या रंगाचा कपडा बांधला आहे. या लूकमध्ये कार्तिक हुबेहूब ‘भूल भुलैय्या’मधील खिलाडी अक्षय कुमारसारखाच दिसत आहे. या पोस्टरमध्ये कार्तिक एका काऊचवर बसला आहे. दुसऱ्या एका पोस्टरमध्ये त्याच्या चहू बाजूंनी मानवी सांगाडे दिसत आहे.
‘भूल भुलैय्या 2’चा फर्स्ट लूक निर्माता भूषण कुमार आणि मुराद खेतानी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला. या सिनेमाचं दिग्दर्शन अनीस बाज्मी करत आहेत. या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करताना, ‘१३ वर्षांनंतर... द हॉन्टिंग कॉमेडी रिटर्न्स’ असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या पोस्टरवर तरी कार्तिकच्या लूकमध्ये जास्त बदल करण्यात आला नाही. त्यामुळे रुपेरी पडद्यावर कार्तिक अक्षयसारखी जादू दाखवणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे.