अभिनेत्री भाग्यश्रीने लेकाला खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, शेअर केले जुने फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 16:28 IST2026-02-22T16:28:06+5:302026-02-22T16:28:49+5:30
भाग्यश्रीचा जुना फोटो पाहून चाहतेही 'मैने प्यार किया'च्या आठवणीत रमले.

अभिनेत्री भाग्यश्रीने लेकाला खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, शेअर केले जुने फोटो
'मैने प्यार किया' फेम अभिनेत्री भाग्यश्रीने आपला मुलगा अभिमन्यू दासानी याच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक अतिशय भावूक पोस्ट शेअर केली आहे. लेकाच्या बालपणापासून ते आत्तापर्यंतचे फोटो शेअर केले आहेत. भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानी ३६ वर्षांचा झाला आहे. तसंच तोही एक अभिनेता आहे. 'मिनाक्षी सुंदरेश्वर', 'मोनिका ओ माय डार्लिंग','आँख मिचोली' अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.
भाग्यश्रीने अभिमन्यूचे अनेक फोटो शेअर करत लिहिले, "तू माझे आयुष्य बदलून टाकलंस. प्रेमाने गुंडाळलेलं माझं स्वप्न, माझं जग... तू माझा लाडका लेक आहेस. माझं स्वतःचं म्हणता येईल अशा त्या चिमुकल्या आनंदाच्या गोळ्यापासून ते आजचा देखणा, गुणी आणि खंबीर आधारस्तंभ ज्याच्यावर आम्ही विश्वासाने विसंबून राहू शकतो... हा प्रवास आठवताना माझ्या चेहऱ्यावर हसू येतं. यातील प्रत्येक फोटो एक खास आठवण जपून आहे." अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या असून, या फोटोंमध्ये छोटा अभिमन्यू आई-वडिलांसोबत केक कापताना आणि शाळेतील मस्ती करताना दिसत आहे.
भाग्यश्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, ती सांगलीच्या पटवर्धन या राजघराण्यातील असून तिला 'सांगलीची राजकुमारी' म्हणून ओळखले जाते. १९८९ मध्ये सलमान खानसोबत पदार्पण केल्यानंतर ती प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच, १९९० मध्ये तिने व्यावसायिक हिमालय दासानी यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर तिने कुटुंबाला प्राधान्य देत चित्रपटसृष्टीपासून काही काळ दुरावा राखला होता. विशेष म्हणजे, लग्नानंतर तिने केवळ आपल्या पतीसोबतच चित्रपट करण्याची अट निर्मात्यांसमोर ठेवली होती, परंतु हा निर्णय बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरला नाही.
भाग्यश्रीला अभिमन्यू आणि अवंतिका ही दोन मुले असून दोघांनीही आता अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. अभिमन्यूने २०१८ मध्ये 'मर्द को दर्द नहीं होता' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले, तर मुलगी अवंतिका 'मिथ्या' या वेब सीरिजमध्ये झळकली आहे. मुलांच्या संगोपनानंतर भाग्यश्रीने पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात पुनरागमन केले असून, ती आपल्या पतीसोबत 'स्मार्ट जोडी' या रिअॅलिटी शोमध्येही दिसली होती.
सध्या भाग्यश्रीच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दलही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. ती लवकरच रितेश देशमुखच्या 'छत्रपती शिवाजी महाराज' या ऐतिहासिक चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट १ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त तिने शेअर केलेले हे फोटो आणि तिची कारकीर्द पाहून चाहते तिचे भरभरून कौतुक करत आहेत.