Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 15:54 IST2025-12-27T15:52:10+5:302025-12-27T15:54:09+5:30
सलमान खानने त्याच्या वाढदिवशी चाहत्यांना खास भेट दिली आहे. त्याच्या आगामी 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. बातमीवर क्लिक करुन नक्की बघा

Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सलमान खानने आपल्या बहुप्रतिक्षित ‘बॅटल ऑफ गलवान’ (Battle Of Galwan) या चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज केला आहे. देशाच्या सीमेवर उभं राहून प्राणपणाने लढणाऱ्या भारतीय सैनिकांना अर्पण केलेला हा एक गंभीर आणि हृदयस्पर्शी टीझर आहे. १ मिनिटं १२ सेकंदाच्या या टीझरमध्ये सलमान खानचा जबरदस्त अंदाज पाहायला मिळतोय.
या चित्रपटात सलमान खान भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून, त्याचा हा अवतार आजवरच्या सर्वात प्रभावी आणि दमदार भूमिकांपैकी एक मानला जात आहे. त्याचा कणखर पण संयमी स्वभाव, आक्रमकता आणि शांततेतून व्यक्त होणारी ताकद लक्ष वेधून घेत आहे. टीझरच्या शेवटच्या क्षणी सलमानची खंबीर नजर प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवणारी आहे.
टीझरमध्ये हिमालयातील आणि पर्वतीय सीमांवरील युद्धाची कठोर वास्तविकता अत्यंत प्रभावी पद्धतीने दाखवली आहे. हिमेश रेशमिया यांनी दिलेलं दमदार पार्श्वसंगीताचा टीझरमधील दृश्यांना आणखी प्रभावी करण्यास मदत करतो. ‘बॅटल ऑफ गलवान’ हा फक्त युद्धपट नाही, तर देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचे साहस आणि सत्य दाखवतो. शौर्य जरी अमर असले तरी खरा विजय नेहमी शांततेचाच असतो, हा संदेशही या टीझरमधून मिळतोय.
अपुर्व लखिया दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान प्रमुख भूमिकेत आहे. शिवाय या चित्रपटात चित्रांगदा सिंगही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून, ‘बॅटल ऑफ गलवान’ हा चित्रपट सलमा खान यांच्या ‘सलमान खान फिल्म्स’ या बॅनरखाली निर्मित होत आहे. 'मौत से क्या डरना उसे तो आना है', अशा दमदार संवादाने टीझरची अखेर होते. ‘बॅटल ऑफ गलवान’ सिनेमा १७ एप्रिल २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.