"मला तुमचाच मुलगा समजून माफ करा"; गाण्यामुळे वादात अडकलेल्या रॅपर बादशहाने मागितली माफी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 20:52 IST2026-03-07T20:42:45+5:302026-03-07T20:52:58+5:30
रॅपर बादशहाच्या गाण्यावरून मोठा गदारोळ! हरियाणा पोलिसांकडून एफआयआर आणि लुकआउट नोटीस

"मला तुमचाच मुलगा समजून माफ करा"; गाण्यामुळे वादात अडकलेल्या रॅपर बादशहाने मागितली माफी
Badshah Apology: आपल्या गाण्यांनी तरुणाईला वेड लावणारा प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशहा सध्या एका मोठ्या कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. त्याचे नवीन हरियाणवी गाणे 'टटीरी' वादाच्या भोवऱ्यात अडकले असून, हरियाणा पोलिसांनी याप्रकरणी रॅपरवर एफआयआर दाखल केला आहे. इतकेच नाही तर त्याच्याविरुद्ध लुकआउट नोटीस काढण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बादशाहने माफी मागितली आहे.
वादाचे नेमके कारण काय?
१ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या टटीरी या गाण्यातील काही दृश्ये आणि शब्दांवरून हा सर्व वाद सुरू झाला आहे. गाण्यामध्ये शालेय गणवेशातील मुली हरियाणा रोडवेजच्या बसमध्ये नाचताना आणि आक्षेपार्ह हावभाव करताना दाखवण्यात आल्या आहेत. गाण्याचे बोल महिला आणि अल्पवयीन मुलींचा अवमान करणारे आणि अश्लील असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. नारी तू नारायणी उत्थान समिती आणि शिव आरती इंडिया फाउंडेशनने याविरोधात तक्रार नोंदवली आहे.
हरियाणा महिला आयोगाकडून समन्स
हरियाणा राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. गाण्यातील मजकूर सामाजिक आणि नैतिक मर्यादांचे उल्लंघन करणारा असल्याचे म्हणत आयोगाने बादशहाला समन्स बजावले आहे. महिलांना वस्तूच्या स्वरूपात मांडणाऱ्या अशा कंटेंटवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
'मला माफ करा, मी तुमचाच मुलगा आहे'; बादशहाची भावनिक साद
चौफेर टीका आणि कायदेशीर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर बादशहाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून जाहीर माफी मागितली आहे. "मी स्वतः हरियाणाचा आहे आणि मला माझ्या हरियाणवी अस्मितेचा अभिमान आहे. माझा उद्देश कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. हिप-हॉप शैलीमध्ये अनेकदा प्रतिस्पर्ध्यांना कमी लेखण्यासाठी काही शब्दांचा वापर केला जातो, पण ते महिला किंवा मुलांसाठी कधीच नव्हते. जर माझ्या गाण्यामुळे माझ्या हरियाणवी बांधवांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी मनापासून माफी मागतो. मला तुमचाच मुलगा समजून माफ करा," अशी विनंती त्याने व्हिडिओमध्ये केली आहे.
गाणे सर्व प्लॅटफॉर्मवरून हटवले
वाढता वाद पाहता बादशहाने हे गाणे सर्व अधिकृत चॅनेल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे स्पष्ट केले आहे. हे गाणे बादशहा आणि सिमरन जगलान यांनी गायले असून, त्याचे संगीत हितेनने दिले होते.