"बाबा वारल्यावर इंडस्ट्रीतून कोणीही मदत केली नाही"; अभिनेत्याचा संताप, शाहरुख खानबद्दल काय म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 12:54 IST2025-10-06T12:39:13+5:302025-10-06T12:54:52+5:30
प्रसिद्ध अभिनेत्याने बॉलिवूड इंडस्ट्रीवर संताप व्यक्त करत इतके दिवस साठवलेला मनातील राग बाहेर काढला आहे.

"बाबा वारल्यावर इंडस्ट्रीतून कोणीही मदत केली नाही"; अभिनेत्याचा संताप, शाहरुख खानबद्दल काय म्हणाला?
सध्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' अभिनेता रजत बेदी (Rajat Bedi) चांगलाच चर्चेत आहे. रजतने बॉलिवूडला 'निर्दयी इंडस्ट्री' म्हटलं आहे. निर्माता-दिग्दर्शक असलेल्या वडिलांच्या निधनानंतर इंडस्ट्रीतील कोणीही त्यांच्या कुटुंबाला मदत केली नाही, असा अनुभव रजत बेदीने एका मुलाखतीदरम्यान सांगितला. त्यामुळेच रजतने बॉलिवूडवर ताशेरे ओढले आहेत. काय म्हणाला रजत?
वडिलांच्या निधनानंतर बॉलिवूडने दुर्लक्ष केलं
रजत बेदीने एका मुलाखतीत सांगितलं की, जेव्हा त्याचे वडील आणि निर्माता-दिग्दर्शक नरेंद्र बेदी यांचं वयाच्या ४५ व्या वर्षी निधन झालं, तेव्हा रजत फक्त नऊ वर्षांचा होता. रजत म्हणाला की, "मला स्पष्टपणे आठवतं की, दिग्दर्शक प्रकाश मेहरा आणि त्यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त इंडस्ट्रीतील कोणीही आमच्याकडे ढुंकून पाहिले नाही. वडिलांच्या निधनानंतर सुमारे सहा महिने ते पुढे वर्षभर प्रकाश मेहरा यांनी त्यांच्या घरी पैसे पाठवले. त्यांनी रजत बेदी यांच्या आईला, "वहिनी, काळजी करू नका," असं सांगितलं होतं.''
रजत बेदी पुढे म्हणाला की, ''माझीआई आयुष्यभर गृहिणी होती आणि आईने तिन्ही मुलांना एकटीने वाढवलं. प्रकाशजींशिवाय कोणीही आमच्याकडे पाहिले नाही. ही खूप निर्दयी इंडस्ट्री आहे.'' वडिलांच्या निधनानंतर दोन वर्षांनी आजोबांचं निधन झाल्यामुळे रजतचा चित्रपटसृष्टीशी संबंध तुटला होता. नंतर १८ व्या वर्षी रजत बेदीने रमेश सिप्पींच्या 'जमाना दीवाना' (Zamaana Deewana) चित्रपटासाठी साहाय्यक दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळली.
रजतने आठवण सांगितली की, त्यावेळी त्याची शाहरुख खानशी खूप चांगली मैत्री होती. शाहरुख रजतला 'टायगर' म्हणतो. अनेक वर्षांनंतर 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या ट्रेलर प्रीव्ह्यूसाठी रजत बेदी शाहरुखच्या घरी गेला होता. "स्क्रिनिंगपूर्वी शाहरुखने एक लहानसं भाषण केलं. त्यात त्याने माझा उल्लेखही केला आणि म्हणाला, 'आणि टायगर देखील या शोचा भाग आहे.' इतक्या वर्षांनंतरही त्याला माझं ते नाव आठवलं, हे पाहून मी थक्क झालो. तो काहीही विसरत नाही," असं रजत बेदीने सांगितलं.
'कोई... मिल गया', 'इंडियन' आणि 'इंटरनॅशनल खिलाडी' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेला रजत बेदीने गेल्या काही वर्षांत चित्रपटसृष्टीत यश न मिळाल्याने कॅनडाला स्थलांतर केले होते. मात्र, आता आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या वेबसीरिजमध्ये काम करून रजतने दमदार कमबॅक केलं आहे.