आयुषमान खुराणाच्या या चित्रपटाचे बोनी कपूरने घेतले हक्क, दाक्षिणात्य भाषांमध्ये करणार रिमेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 17:45 IST2019-03-19T17:42:45+5:302019-03-19T17:45:00+5:30
बधाई हो या चित्रपटात आयुष्यमान खुराणाशिवाय नीना गुप्ता, गजराज राव, सान्या मल्होत्रा आदी प्रमुख भूमिकेत होते. अमित शर्मा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.

आयुषमान खुराणाच्या या चित्रपटाचे बोनी कपूरने घेतले हक्क, दाक्षिणात्य भाषांमध्ये करणार रिमेक
‘बधाई हो’ या चित्रपटाने आयुष्यमान खुराणाला बॉलिवूडचा ए लिस्ट स्टार बनवले आहे. त्याच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. एवढेच नव्हे तर या चित्रपटाचे समीक्षकांनी देखील चांगलेच कौतुक केले. या चित्रपटातील नीना गुप्ता यांच्या अभिनयाचे तर चांगलेच कौतुक झाले होते. अमिताभ बच्चन यांना नीना गुप्ता यांचा अभिनय खूप आवडल्यामुळे त्यांनी नीना यांना खास पत्र लिहून त्याबाबत कळवले होते.
बधाई हो या चित्रपटात आयुष्यमान खुराणाशिवाय नीना गुप्ता, गजराज राव, सान्या मल्होत्रा, सुरेखा सिक्री आदी प्रमुख भूमिकेत होते. अमित शर्मा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. बधाई हो हा एका वेगळ्या विषयावर आधारित चित्रपट असल्याने या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली होती. नातवंडांना खेळवण्याच्या वयात आयुष्यमानची आई प्रेग्नंट राहते आणि ही गोष्ट जगापासून लपवता लपवता आयुष्यमान रडकुंडीला येतो, अशी याची ढोबळ कथा आहे. मजेदार अंदाजातील ही कथा प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. हा चित्रपट खूपच कमी बजेटचा असला तरी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलेच कलेक्शन केले.
बधाई हो या चित्रपटाचे हक्क निर्माते-दिग्दर्शक बोनी कपूर यांनी घेतले असून या चित्रपटाचा रिमेक तामीळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या भाषेत बनवला जाणार आहे. याविषयी त्यांनीच स्वतः एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितले आहे. त्यांनी मुंबई मिररशी बोलताना सांगितले, बधाई हो हा चित्रपट दाक्षिणात्य भाषेत बनवण्यासाठी मी या चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहेत. हा चित्रपट सगळ्याच वयोगटातील लोकांना प्रचंड आवडला होता. तसेच क्लासेस आणि मासेस अशा दोन्ही गटातील लोकांनी हा डोक्यावर घेतला होता. त्यामुळेच या चित्रपटाचा रिमेक बनवण्याचे मी ठरवले. या चित्रपटाला दाक्षिणात्य भाषेत देखील चांगला प्रतिसाद मिळेल अशी मला खात्री आहे.
या चित्रपटाच्या रिलीजच्या पहिल्याच दिवशी आयुष्यमानने स्वत:च्याच चित्रपटाचा विक्रम मोडीत काढला होता. होय, ‘बधाई हो’ आयुष्यमानच्या करिअरमधील सर्वात मोठी ओपनर फिल्म ठरली होती.