आयुषमान खुरानाने लोकसभा निवडणुकीपूर्वी संसदेच्या नवीन इमारतीला दिली भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 14:56 IST2024-04-16T14:55:48+5:302024-04-16T14:56:30+5:30
Ayushman Khurana : अभिनेता आयुषमान खुरानाने नवीन संसद भवनाला भेट दिली आणि सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

आयुषमान खुरानाने लोकसभा निवडणुकीपूर्वी संसदेच्या नवीन इमारतीला दिली भेट
लोकसभा निवडणूक २०२४ सुरू होण्यासाठी फक्त तीन दिवस उरले आहेत. सार्वत्रिक निवडणुकीचा पहिला टप्पा १९ एप्रिलपासून सुरू होत आहे. यावेळच्या सार्वत्रिक निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहे आणि शेवटचा टप्पा १ जून रोजी होणार आहे. त्यानंतर ४ जून रोजी निकाल येईल. यावेळी बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना राणौत लोकसभा निवडणूक लढवणार आहे. दरम्यान नुकतेच अभिनेता आयुषमान खुराना(Ayushman Khurana)ने नवीन संसद भवनाला भेट दिली होती.
आयुषमान खुरानाने नवीन संसदेतील त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो शेअर करत लिहिले की, नवीन संसद भवनात आल्यामुळे मला खूप चांगले वाटले. आपल्या लोकशाहीचे प्रतिनिधित्व करणारी ही भव्य इमारत पाहिल्यानंतर मला अभिमान वाटतो, यात आपला वारसा, संस्कृती आणि सन्मान आहे, जय हिंद.'
आता आयुषमानची ही पोस्ट पाहून चाहते त्याला अनेक प्रश्न विचारत आहे. एका चाहत्याने या पोस्टवर लिहिले की, आयुषमान तू पण निवडणुकीत उभा असणार आहेस का ? असेल तर कुठल्या पक्षाकडून आहेस. दुसऱ्या युजरने लिहिले की, तू माझा आवडता अभिनेता आहे, पण खऱ्याकडून साथ देशील. आणखी एकाने म्हटले की, नायक'च्या दुसऱ्या भागात हाच असणार.
जनजागृतीसाठी निवडणूक आयोगाने अभिनेत्याची केली निवड
तरुणांना मतदानाबाबत जागरूक करण्यासाठी निवडणूक आयोगाने अभिनेता आयुषमान खुरानाची निवड केली आहे. याबाबत आयुषमान म्हणाला होता की, भारतीय निवडणूक आयोगाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तरुणांना मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी मला निवडून दिले याचा मला सन्मान वाटत आहे.तरुणांची प्रचंड लोकसंख्या असलेला आपला देश आहे. त्यामुळे तरुणांनी मतदान करून आपल्या देशाचे भवितव्य ठरवण्यासाठी सहभाग घेणे अत्यावश्यक आहे.