कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे कुटुंबासोबत न राहता 'या' ठिकाणी राहतोय हा अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 16:01 IST2020-11-02T16:00:39+5:302020-11-02T16:01:08+5:30
आयुषमान खुराणाने सांगितले की, “मी या खतरनाक साथीच्या रोगाची खूप काळजी घेत असून त्याचा संसर्ग माझ्या कुटुंबापर्यंत पोहोचू नये यासाठी शक्य ती सर्व खबरदारी घेतो. माझी पत्नी आणि दोन मुलांना माझ्यापासून व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी मी प्रयत्न करीत आहे.

कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे कुटुंबासोबत न राहता 'या' ठिकाणी राहतोय हा अभिनेता
बॉलिवूड स्टार आयुषमान खुराना सध्या प्रगतीपथावर असणारी प्रेम कथा ‘चंदीगड करे आशिकी’ च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूरने केले आहे. आयुषमान हा सध्या देशातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला असून अलीकडेच टाईम मॅगझिनने त्याला जगातील सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये स्थान दिले आहे. तो सध्या आपले होमटाऊन असणाऱ्या चंदीगड शहरात चित्रीकरण करीत असला तरी आपल्या कुटुंबासह राहत नसल्याचे आमच्या निदर्शनास आले. खरे तर आयुषमान एका हॉटेलमध्ये राहत आहे. याचे कारण म्हणजे प्राणघातक ठरू शकणारा कोरोना व्हायरस, जो सध्या प्रत्येक भारतीयाच्या चिंतेचा विषय बनून राहिला आहे.
याबाबत बोलताना आयुषमानने सांगितले की, “मी या खतरनाक साथीच्या रोगाची खूप काळजी घेत असून त्याचा संसर्ग माझ्या कुटुंबापर्यंत पोहोचू नये यासाठी शक्य ती सर्व खबरदारी घेतो. माझी पत्नी आणि दोन मुलांना माझ्यापासून व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी मी प्रयत्न करीत आहे. मी काम सुरू केले असले तरी चंदीगड मधील माझे पालक नेहमी सुरक्षित रहावेत यासाठीही माझा प्रयत्न आहे.
जरी फिल्म इंडस्ट्री पुन्हा सुरू करण्यासाठी मला योगदान द्यायचे असले तरी कोरोना व्हायरसपासून माझ्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याचीही माझी जबाबदारी आहे.”त्याने पुढे सांगितले की, “यासाठी मी संपूर्ण प्रोडक्शन टीमसोबत हॉटेलमध्ये थांबलो आहे. चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण होई पर्यंत आम्ही याच ठिकाणी थांबणार आहोत. यातूनही जेव्हा मी कुटुंबातील सदस्यांना भेटायला जातो, त्यावेळी सोशल डिस्टन्स पाळण्यासोबतच मास्कही वापरत असतो. हे काहीसे विचित्र वाटत असले तरी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ते आवश्यक आहे.”
आयुषमान हे मान्य करतो की कुटुंबासोबत वेळ घालवता न येणे हे मनाला टोचणारे आहे. तो सांगतो, “चित्रीकरण सुरू असताना वेळोवेळी टेस्टिंगसह मी आरोग्याची तपासणी करून घेतो. हॉटेलमध्ये राहिल्यामुळे बायो बबलच्या माध्यमातून माझे कुटुंब तसेच रूममधील इतर सदस्यही सुरक्षित राहू शकतात. चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर कुटुंबापासून दूर राहावे लागलेला वेळ मी भरून काढणार आहे.”
‘चंदीगड करे आशिकी’ च्या सेटवर अभिषेक आणि प्रज्ञा कपूर तसेच त्यांचा संपूर्ण प्रोडक्शन क्रू कोरोना व्हायरसला दूर ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे याचे श्रेय आयुषमान त्यांना देतो. तो पुढे सांगतो, “प्रोडक्शन टीमने आमच्या सेटवर प्रत्येकाला कामाची सुरक्षित जागा मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत.
सध्या आम्ही अतिशय असामान्य परिस्थितीत चित्रीकरण करीत आहोत. अशी परिस्थिती यापूर्वी कोणीच अनुभवली नव्हती. त्यामुळे प्रत्येक जण आरोग्यदायी आणि सुरक्षित राहण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करीत आहे.”