फरहान अख्तरचा '१२० बहादुर' संपल्यावर प्रेक्षक स्तब्ध; थिएटरमध्ये फडकावला तिरंगा, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 12:59 IST2025-11-20T12:57:33+5:302025-11-20T12:59:01+5:30
'१२० बहादुर' सिनेमा संपल्यावर एका थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत थिएटरमधील प्रेक्षकांनी तिरंगा फडकावताना दिसतोय

फरहान अख्तरचा '१२० बहादुर' संपल्यावर प्रेक्षक स्तब्ध; थिएटरमध्ये फडकावला तिरंगा, व्हिडीओ व्हायरल
फरहान अख्तरची प्रमुख भूमिका असलेला '१२० बहादुर' सिनेमा उद्यापासून सर्वत्र रिलीज होणार आहे. तत्पूर्वी हा सिनेमा काही मोजक्या थिएटरमध्ये तीन दिवस आधीच रिलीज करण्यात आला. '१२० बहादुर' पाहून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच '१२० बहादुर' सिनेमा पाहून एका थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सिनेमा संपल्यावर प्रेक्षक स्तब्ध झाले असून त्यांनी तिरंगा फडकावला आहे.
'१२० बहादुर' पाहून प्रेक्षकांची प्रतिक्रिया
सोशल मीडियावर एका थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत '१२० बहादुर' संपल्यावर प्रेक्षक खुर्चीवरुन उठून उभे राहिले आहेत. सर्वांनी सिनेमातील भारतीय जवानांसाठी मानवंदना दिली. याशिवाय काही प्रेक्षकांनी थिएटरमध्ये तिरंगा फडकावला आहे. एकूणच '१२० बहादुर' सिनेमाने प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने मंत्रमुग्ध केलं असून सिनेमातील शौर्यगाथा पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा उमटला आहे. सर्वजण फरहान अख्तरच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत.
'१२० बहादुर'चं चित्रीकरण लडाख, राजस्थान आणि मुंबईत झालं आहे. हा चित्रपट युद्धभूमीची थरारक अनुभूती देतो. बर्फाच्छादित प्रदेशांपासून रणभूमीच्या शांततेपर्यंत प्रत्येक फ्रेममध्ये सखोलता आणि वास्तविकता दिसते. चित्रपटाचे दिग्दर्शन राजनीश ‘रेझी’ घोष यांनी केले असून, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर (एक्सेल एंटरटेन्मेंट) तसेच अमित चंद्रा (ट्रिगर हॅपी स्टुडिओज) यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘१२० बहादुर’ उद्या २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सर्वत्र चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.