कहानीबाज: जगण्याचा उत्सव साजरा करणारी हृदयस्पर्शी भेट
By मोरेश्वर येरम | Updated: March 24, 2026 15:44 IST2026-03-24T15:43:21+5:302026-03-24T15:44:11+5:30
"स्वप्न पूर्ण होत नाहीत, याचा अर्थ असा की तुम्ही जिवंत आहात, कारण स्वप्नं तुम्हाला जागं ठेवतात", असे सकारात्मक विचार ते मांडतात.

कहानीबाज: जगण्याचा उत्सव साजरा करणारी हृदयस्पर्शी भेट
मोरेश्वर येरम
बॉलिवूडमधील एक असा अभिनेता ज्याचा चेहरा पाहताच आपल्याला सिनेमातले क्रूर खलनायक आठवतात, तो अभिनेता एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते आशिष विद्यार्थी त्यांच्या ३० वर्षांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीनंतर आता 'कहानीबाज' म्हणून नवी ओळख निर्माण करत आहेत. त्यांच्या 'कहानीबाज' या शोच्या माध्यमातून ते केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत नाहीत, तर त्यांच्या भावनिक जखमांवर फुंकर घालण्याचे काम करत आहेत. 'कहानीबाज' ही एक संघर्ष, नाती, भावना आणि यशाची 'अनफिल्डर्ड' गाथा आहे. आशिष विद्यार्थी त्यांच्या आयुष्याशी निगडीत गोष्टी सांगताना तुम्हाला कधी तुमच्या जगात घेऊन जातात हे कळत नाही. त्यांच्या प्रत्येक कथेत तुम्ही स्वत:ला ठेवता, स्वत:ला शोधता, स्वत:शी तुलना करता. प्रत्येक प्रसंग तुम्हाला तुमचा वाटतो आणि आपसूकच डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. आशिष विद्यार्थी यांचा हा शो म्हणजे केवळ कथाकथन पुरता मर्यादित नाही, तर तो जीवनातील अनुभवांचा एक प्रामाणिक प्रवास तुमच्यासमोर उभा ठाकतो. जो प्रत्येकाच्या मनाला भेदून जातो.
बालपणीच्या आठवणी प्रत्येकासाठी खास असतात पण त्यातून नव्याने जगण्याची प्रेरणा घेता येऊ शकते हे या कार्यक्रमातून वेळोवेळी जाणवते. आशिष विद्यार्थी प्रेक्षकांसमोर स्वत:चा भूतकाळ मांडतात पण त्यांच्या खास शैलीतून जेव्हा तो तुमच्या समोर येतो तेव्हा त्यांचा भूतकाळ कधी तुम्हाला तुमच्या भूतकाळात घेऊन जातो हे कळत नाही. कथा ऐकताना तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या भूतकाळातील क्षण तरळू लागतात. तुम्हाला तुमचा संघर्ष आठवू लागतो आणि त्याला सामोरे जाण्याची ताकद मनोमन तयार होते. नात्यांच्या अतूट बंधनाचे धागे आणखी मजबूत होतात आणि तुम्हाला अंतर्मुख करायला भाग पाडतात.
'कहाण्या ज्या जखमा भरून काढतात'
आशिषजींच्या मते, हा शो म्हणजे एक प्रकारची 'थेरपी' आहे. आपल्या आजूबाजूला पसरलेल्या नकारात्मकतेच्या काळात, लोकांमध्ये उमेद जागवणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. "स्वप्न पूर्ण होत नाहीत, याचा अर्थ असा की तुम्ही जिवंत आहात, कारण स्वप्नं तुम्हाला जागं ठेवतात", असे सकारात्मक विचार ते मांडतात.
'कहानीबाज'मधून मिळणारे तीन संदेश
१. अपयश पचवता आले पाहिजे: "जर तुम्ही पडलात, तर लाजण्यापेक्षा स्वतःला सावरून पुन्हा उभे राहणे महत्त्वाचे आहे"
२. मैत्रीचे महत्त्व: जिथे तुम्हाला मोठेपणा दाखवावा लागत नाही, असा हक्काचा मित्र आयुष्यात असणे किती गरजेचे आहे, हे ते आवर्जून सांगतात.
३. आदर्श: कोणा मोठ्या स्टारला नाही, तर आपल्या आई-वडिलांनाच आपला खरा आदर्श मानण्याचा संदेश. आई-वडिलांनी तुमच्यासाठी केलेल्या संघर्षातूनच तुम्हाला प्रेरणा मिळू शकते याचे उत्तम नमुने ते सादर करतात.
'कहानीबाज' इतका खास का?
हा शो प्रेक्षकांना आपलासा वाटतो कारण आशिष विद्यार्थी यात एक 'सेलिब्रिटी' म्हणून नाही तर 'आपल्यातलाच एक माणूस' म्हणून बोलतात. हसवता हसवता डोळ्यात पाणी आणण्याची आणि पुन्हा उमेद देण्याची ताकद आशिष विद्यार्थी यांच्या गोष्टींमध्ये आहे. सिनेमाच्या पडद्यामागचे किस्से सांगतानाच, ते खऱ्या आयुष्यातील संघर्षाला अधिक महत्त्व देतात. थोडक्यात सांगायचे तर आशिष विद्यार्थी यांचा 'कहानीबाज' हा शो म्हणजे जगण्याचा उत्सव साजरा करणारी एक हृदयस्पर्शी भेट आहे. जर तुम्हाला आयुष्यात थोडी आशा आणि नवी ऊर्जा हवी असेल, तर या गोष्टी नक्कीच ऐकायला हव्यात.