अभिनेते आशिष विद्यार्थी यांचा अपघात, भरधाव दुचाकीस्वाराने दिली धडक; पत्नीही जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 16:53 IST2026-01-03T16:48:09+5:302026-01-03T16:53:16+5:30
दरम्यान आशिष विद्यार्थी यांनी स्वत: व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिनेते आशिष विद्यार्थी यांचा अपघात, भरधाव दुचाकीस्वाराने दिली धडक; पत्नीही जखमी
अभिनेते आणि फूड ब्लॉगर आशिष विद्यार्थी आणि त्यांची पत्नी रुपाली यांचा अपघात झाला आहे. रस्ता ओलांडताना एका भरधाव दुचाकीस्वाराने आशिष विद्यार्थी आणि त्यांच्या पत्नीला धडक दिली. यामध्ये दोघंही जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या ते डॉक्टरांच्या निरीक्षणखाली आहेत. दरम्यान आशिष विद्यार्थी यांनी स्वत: व्हिडीओ शेअर करत सर्वांना काळजी करु नका असे सांगितले.
ही दुर्घटना गुवाहाटी येथील जू रोडजवळ घडली. गीता नगर पोलिस स्टेशनचे अधिकारी याचा तपास करत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, चांदमारीच्या दिशेने एक भरधाव दुचाकीस्वार आला आणि त्याने आशिष विद्यार्थी यांना धडक दिली. यामध्ये त्यांची पत्नीही जखमी झाली. तसंच दुचाकीस्वारालाही दुखापत झाली. गीता नगर स्टेशनचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि दुचाकीस्वाराला गुवाहाटी मेडिकस कॉलेजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर आशिष विद्यार्थी आणि पत्नी रुपाली यांच्यावर प्राथमिक उपचार केले गेले.
आशिष विद्यार्थी आणि त्यांची पत्नी जू तिनियाली जवळील एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. जेवून निघाल्यावर रस्ता ओलांडतानाच हा अपघात झाला. आता आशिष विद्यार्थी व्हिडीओ शेअर करत म्हणाले, "अनेक न्यूज चॅनलवर माझ्या अपघाताची बातमी आली. हो, माझा अपघात झाला होता पण आता आम्ही ठीक आहोत. रुपाली आणि मी रस्ता ओलांडत होतो तेव्हा एका बाईकने आम्हाला धडक दिली. आम्ही दोघंही आता बरे आहोत. रुपाली ऑब्जर्वेशनमध्ये आहे आणि सगळं काही ठीक आहे. मला किरकोळ दुखापत झाली आहे. दुचाकीस्वारालाही शुद्ध आली आहे. तो लवकर बरा व्हावा अशी मी आशा करतो. रुग्णालयातील सर्वांनी आमची चांगली काळजी घेतली त्याबद्दल त्यांचे आभार. तसंच अनेक चाहत्यांनी बातम्यांमध्ये पाहून चिंता व्यक्त केली त्यांचेही आभार."