विराटच्या शतकी कामगिरीनंतर अनुष्काची प्रेमळ पोस्ट, 'तो' फोटो केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 18:04 IST2025-12-03T18:04:00+5:302025-12-03T18:04:34+5:30
शतकी कामगिरीनंतर पत्नी अनुष्का शर्माने पोस्ट शेअर करत विराटवरील प्रेम व्यक्त केलं आहे.

विराटच्या शतकी कामगिरीनंतर अनुष्काची प्रेमळ पोस्ट, 'तो' फोटो केला शेअर
Anushka Sharma Reaction Virat Kohli ODI Century : रांची वनडे सामन्यात शतकी खेळी केल्यानंतर विराट कोहलीने पुन्हा एकदा शतकी धमाका केला आहे. रायपूर वनडे सामन्यात विराट कोहलीने ९० चेंडूत सलग दुसरं शतक ठोकलं. दोन वर्षांनी त्याच्या भात्यातून वनडे क्रिकेटमध्ये बॅक टू बॅक शतक पाहायला मिळाले. लुंगी एनिगडीनं ९३ चेंडूत ७ चौकार आणि २ षकाराच्या मदतीने १०२ धावांवर कोहलीच्या खेळीला ब्रेक लावला. विराट कोहलीने वनडेतील ५३वं आणि आंतरराष्ट्रीय ८४वं शतक ठोकत विक्रमांना गवसणी घातली. या कामगिरीनंतर पत्नी अनुष्का शर्माने पोस्ट शेअर करत विराटवरील प्रेम व्यक्त केलं आहे.
अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर विराट कोहलीच्या शतकाच्या सेलिब्रेशनचा एक खास फोटो शेअर केला. या फोटोसोबत तिने कोणतेही मोठे कॅप्शन न लिहिता, फक्त हार्ट इमोजी पोस्ट केला. यातून तिनं विराटवरील प्रेम, आनंद आणि अभिमान व्यक्त केला.

अनुष्का ही विराटची सर्वात मोठी चीअरलीडर आहे. अनुष्का त्याला प्रोत्साहन द्यायला कधीही विसरत नाही. अनुष्का विराटसाठी प्रेरणा आणि सकारात्मकतेचा स्रोत आहे. विराटचंही अनुष्कावर प्रचंड प्रेम आहे. तो त्याच्या प्रत्येक कामगिरीचे श्रेय तिलाच देतो. विराट कोहली मैदानावर जेव्हा-जेव्हा चांगली कामगिरी करतो, तेव्हा-तेव्हा तो त्याच्या गळ्यातील लॉकेटचे प्रेमाने चुंबन घेतो. विराट कोहलीच्या गळ्यात असलेल्या या लॉकेटमध्ये त्याची वेडिंग रिंग आहे.
विराट कोहलीच्या शतकानंतर सोशल मीडियावर चाहते त्याचे कौतुक करताना दिसत आहेत, तसेच युजर्स अनुष्काच्या पोस्टवर आपली प्रतिक्रियाही देत आहेत. टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर विराट कोहली फक्त वनडेत सक्रीय आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत विराट कोहलीला खातेही उघडता आले नव्हते. वनडे कारकिर्दीत पहिल्यांदाच त्याच्यावर सलग दोन वेळा शून्यावर बाद होण्याची वेळ आली होती. पण सिडनीच्या तिसऱ्या वनडेत कोहलीनं दमदार अर्धशतक झळकावले. हाच फॉर्म त्याने घरच्या मैदानातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही कायम ठेवला आहे. रांची वनडेत त्याने १३५ धावांची धडाकेबाज खेळी केली होती. त्यात आता आणखी एक मोठी खेळी त्याच्या भात्यातून पाहायला मिळत आहे.