डिप्रेशनमुळे दोन वर्षांपासून गायब होती ही अभिनेत्री, आता करणार चित्रपटसृष्टीत कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 13:59 IST2019-12-02T13:53:45+5:302019-12-02T13:59:26+5:30
ही अभिनेत्री डिप्रेशनमध्ये असल्याने ती चित्रपटात काम करत नव्हती असे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे.

डिप्रेशनमुळे दोन वर्षांपासून गायब होती ही अभिनेत्री, आता करणार चित्रपटसृष्टीत कमबॅक
अंजना सुखानीने निखिल अडवाणीच्या सलाम-ए-इश्क या चित्रपटात तर रोहित शेट्टीच्या गोलमाल रिटर्न्स या चित्रपटात काम केले होते. तिने काही चित्रपटांमध्ये काम केले असले तरी ती गेल्या दोन वर्षांपासून कोणत्याच चित्रपटात झळकलेली नाहीये. पण गुड न्यूज या चित्रपटाद्वारे ती कमबॅक करत असून ती गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांत काम का करत नाहीये याविषयी एका मुलाखतीत तिने नुकतेच सांगितले आहे. अंजना डिप्रेशनमध्ये असल्याने ती चित्रपटात काम करत नव्हती असे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे.
अंजना सांगते, दोन वर्षांपूर्वी माझ्या मावशीचे आणि त्यानंतर माझ्या आजीचे कर्करोगाने निधन झाले. या सगळ्या दुःखातून मी बाहेर येऊ शकले नाही आणि मी डिप्रेशनमध्ये गेले. माझ्या मावशीचे लग्न झालेले नव्हते. त्यामुळे तिचे माझ्या कुटुंबियांशिवाय कोणीच नव्हते. मी तिच्या किमोथेरपीसाठी सतत तिच्यासोबतच रुग्णालयात असायचे. तिला किमोथेरपीमुळे प्रचंड त्रास होत होता. या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर देखील परिणाम होत होता. या सगळ्यामुळे मी खूप बदलले. मी खूप विचित्रासारखी वागत होते. कधी मला कोणासोबत बोलायला आवडायचे नाही तर कधी मी नेहमीसारखी नॉर्मल असायचे. माझ्यात झालेला हा बदल माझ्या भावाच्या लक्षात आला आणि त्याने मी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत असे मला सुचवले. डॉक्टरांकडे गेल्यावर पहिल्या दिवशी मी काहीच बोलले नाही. मी केवळ रडत होते. चार महिने माझी ट्रीटमेंट सुरू होती.
अंजना गुड न्यूज या चित्रपटात वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, करिना कपूर, दलसीत दोसांज आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत.