झोया अख्तरच्या सिनेमात दिसणार अनन्या पांडे, पहिल्यांदाच करणार एकत्र काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 13:38 IST2021-02-05T13:37:51+5:302021-02-05T13:38:44+5:30
अभिनेत्री अनन्या पांडेने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.

झोया अख्तरच्या सिनेमात दिसणार अनन्या पांडे, पहिल्यांदाच करणार एकत्र काम
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. नुकतीच ती खाली पीली चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली होती. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. या चित्रपटातील तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्यानंतर आता ती प्रसिद्ध दिग्दर्शक झोया अख्तरच्या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
झोया अख्तर ही बॉलिवूडमधील उत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक दिग्दर्शका आहे. तिने 'लस्ट स्टोरीज' आणि 'गली बॉय'सारखे अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. आता अनन्या आणि झोया यांची जोडी एकत्र काम करणार असल्याची चर्चा बी टाउनमध्ये रंगली आहे. हा चित्रपट सध्या प्री-प्रोडक्शन अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात अद्याप कोणतीही सविस्तर माहिती समोर आलेली नाही. अनन्या आणि झोया यांनी या चित्रपटाला सहमती दर्शविली आहे. अनन्या ही झोयाची मोठी फॅन असून या चित्रपटासाठी ती खूपच उत्सुक आहे.
या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. या चित्रपटाची घोषणा करत लवकरच अन्य स्टारकास्टची माहितीही देण्यात येणार आहे.
अनन्या पांडेच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास 'स्टूडेंट ऑफ द ईयर-2′ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अनन्या प्रसिद्धीच्या झोतात आली. या चित्रपटाला 'बेस्ट डेब्यू' फिल्मफेयर अवॉर्डदेखील मिळाला होता. याशिवाय 'पति, पत्नी और वो' आणि 'खाली पीली'मध्येही ती मुख्य भूमिकेत झळकली आहे. दोन्ही सिनेमातील तिच्या भूमिका पसंत केल्या गेल्या.
अनन्याची इच्छा आहे की तिला एखाद्या अॅक्शन सिनेमात मुख्य भूमिका साकारायला मिळावी. अनन्या नुकतीच शकुन बत्राच्या सिनेमाचं गोव्यातील शूट पूर्ण करून मुंबईला परतली. या सिनेमात दीपिका पादुकोण आणि सिद्धार्थ चतुर्वेदी दिसणार आहे.