अमिताभ बच्चन ट्रोल, 'कोट्यवधी' संपत्ती पण स्टाफला दिवाळी बोनस म्हणून दिली 'एवढीच' रक्कम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 10:12 IST2025-10-28T10:11:06+5:302025-10-28T10:12:04+5:30
दिवाळीत बिग बींनी आपल्या स्टाफला काय गिफ्ट दिलं?

अमिताभ बच्चन ट्रोल, 'कोट्यवधी' संपत्ती पण स्टाफला दिवाळी बोनस म्हणून दिली 'एवढीच' रक्कम
दिवाळीमध्ये चित्रपटसृष्टीतील मोठे कलाकार हे पडद्यामागे दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना खास भेटवस्तू आणि मिठाई देऊन त्यांचे आभार मानतात. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी दिवाळीच्या निमित्ताने त्यांच्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू दिल्यात. पण, बिग बींनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या रकमेवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे.
बिग बीं एका व्हायरल व्हिडीओमुळे ते चर्चेत आले आहेत, पण यावेळी त्यांच्यावर कौतुकासोबतच काही प्रमाणात टीकाही होताना दिसत आहे. हा व्हिडीओ सणासुदीच्या काळात बिग बींनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या भेटवस्तूंसंदर्भात आहे. एका कंटेंट क्रिएटरने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यात तो अमिताभ बच्चन यांच्या कर्मचाऱ्यांशी बोलताना दिसत आहे. क्रिएटर कॅमेरा फिरवत म्हणतो, "हे अमिताभ बच्चन यांचे घर आहे आणि येथे मिठाई वाटली जात आहे".
व्हिडीओमध्ये, एका कर्मचाऱ्याने स्वतःहून स्पष्ट केले की केवळ मिठाईच नाही, तर रोख रक्कमही देण्यात आली. त्याने सांगितले, "आम्हाला पैसेही देण्यात आले. मला १० हजार रुपये आणि मिठाईचा बॉक्स मिळाला". व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्येही असाच दावा करण्यात आला आहे की, अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या घरातील कर्मचाऱ्यांना आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रोख आणि मिठाईचा बॉक्स दिला.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर हजारो वेळा पाहिला गेला आहे आणि कमेंट्सच्या माध्यमातून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेक चाहत्यांनी अमिताभ बच्चन यांनी सणासुदीच्या काळात आपल्या कर्मचाऱ्यांविषयी दाखवलेल्या कृतज्ञतेबद्दल आणि काळजी घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. त्यांच्या मते, बिग बींनी कर्मचाऱ्यांच्या कष्टाची दखल घेऊन त्यांना भेटवस्तू देणे ही मोठी गोष्ट आहे. मात्र, काही नेटिझन्सनी अमिताभ बच्चन यांच्यावर टीका केली आहे. या टीकाकारांच्या मते, अमिताभ बच्चन यांची उंची, लोकप्रियता आणि त्यांची प्रचंड संपत्ती पाहता, त्यांनी दिलेली १० हजार रोख रक्कम खूपच कमी आहे. एका मोठ्या अभिनेत्याने आपल्या निष्ठावान कर्मचाऱ्यांना अधिक मोठी भेट द्यायला हवी होती, असे मत त्यांनी व्यक्त केले.