"सकाळी भगवद्गीता वाचायचे आणि रात्री..."; अमिताभ बच्चन यांच्याविषयी रणजीत यांचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 13:13 IST2026-01-04T13:11:25+5:302026-01-04T13:13:11+5:30
अमिताभ बच्चन यांच्या खास सवयीचा त्यांचे सह कलाकार रणजीत यांनी उल्लेख केला. त्याविषयी वाचून तुम्हीही चकीत व्हाल

"सकाळी भगवद्गीता वाचायचे आणि रात्री..."; अमिताभ बच्चन यांच्याविषयी रणजीत यांचा मोठा खुलासा
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याविषयी अनेक किस्से आपण आजवर ऐकले आहेत. अमिताभ बच्चन किती कडक शिस्तीचे आहेत हे आपण सर्वांनीच पाहिलं आहे. अमिताभ यांच्याविषयी असाच एक खुलासा प्रसिद्ध खलनायक रणजीत यांनी एका मुलाखतीत केला आहे. 'रेश्मा और शेरा' (१९७१) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा रणजित यांनी सांगितला. काय म्हणाले?
रणजीत यांनी सांगितलं की, ५५ वर्षांपूर्वी 'रेश्मा और शेरा' या चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थानमधील जैसलमेर येथे सुरू होते. वाळवंटात शूटिंग असल्यामुळे सर्व कलाकारांच्या राहण्याची व्यवस्था तिथेच तंबूंमध्ये करण्यात आली होती. रणजीत आणि अमिताभ बच्चन हे एकाच तंबूत राहत होते.
रणजीत यांनी पाहिले की, अमिताभ बच्चन दररोज सकाळी लवकर उठायचे आणि शांतपणे बसून भगवद्गीतेचे वाचन करायचे. तसेच, दिवसभर शूटिंग करून परतल्यावर रात्री ते काहीतरी लिहीत बसायचे. सुरुवातीला रणजीत यांना कुतूहल वाटले, मात्र काही दिवसांनी त्यांनी अमिताभ यांना विचारले की, "तुम्ही रोज सकाळी काय वाचता आणि रात्री काय लिहिता?"
यावर अमिताभ बच्चन यांनी अत्यंत नम्रपणे उत्तर दिले की, "मी दररोज सकाळी उठल्यावर भगवद्गीता वाचतो आणि रात्री माझ्या आई-बाबांना (हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन) पत्र लिहितो. या पत्रात मी माझ्या कामाची आणि दिवसभरात काय काय केलं, याची सर्व माहिती त्यांना देतो." अमिताभ यांची ही सवय पाहून रणजीत अत्यंत प्रभावित झाले होते.
अमिताभ बच्चन यांचा 'सात हिंदुस्तानी' हा केवळ एकच चित्रपट प्रदर्शित झाला होता, तर 'रेश्मा और शेरा' हा त्यांचा दुसरा चित्रपट होता. त्याकाळी मोबाईल, इंटरनेट नसूनही आपल्या आई-बाबांना रोज पत्र लिहिण्याची आणि दिवसाची सुरुवात अध्यात्मिक मार्गाने करण्याची बिग बींची ही पद्धत रणजीत यांना खूप भावली. तेव्हापासून अमिताभ-रणजीत यांच्यातील ही मैत्री पुढे 'लावारिस', 'नमक हलाल' आणि 'याराना' यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमधून प्रेक्षकांना पाहायला मिळाली.