इतकी वर्ष मुंबईत तरीही बिग बींना मराठी येईना! चाहत्यांची नाराजी, म्हणाले- "रजनीकांतकडून काहीतरी शिका..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 09:55 IST2025-09-08T09:54:46+5:302025-09-08T09:55:07+5:30
बिग बी अमिताभ बच्चन यांनीही त्यांना मराठी बोलता येत नसल्याचं सांगितलं आहे. त्यासोबतच मराठी शिकत असल्याचं बिग बींनी म्हटलं आहे.

इतकी वर्ष मुंबईत तरीही बिग बींना मराठी येईना! चाहत्यांची नाराजी, म्हणाले- "रजनीकांतकडून काहीतरी शिका..."
काही दिवसांपूर्वी राज्यात हिंदी-मराठी वाद पेटला होता. अनेक वर्ष महाराष्ट्रात राहुनही मराठी येत नसलेल्यांबद्दल सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात होता. मराठी बोलणार नाही असं म्हणत मुजोरी करणाऱ्या गुजराती व्यापाराला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिल्यानंतर मराठी-हिंदी वाद उफाळून आला होता. आता बिग बी अमिताभ बच्चन यांनीही त्यांना मराठी बोलता येत नसल्याचं सांगितलं आहे. त्यासोबतच मराठी शिकत असल्याचं बिग बींनी म्हटलं आहे.
बिग बींनी त्यांच्या फेसबुकवरुन एक पोस्ट लिहिली आहे. विशेष म्हणजे ही पोस्ट त्यांनी मराठीतून लिहिली आहे. "कोणीतरी मला सांगितले की तुला मराठी येत नाही आणि तू इतक्या वर्षांपासून मुंबईत राहतोस. हे खरे आहे, पण ते शिकण्याचा प्रयत्न कर, हे शिकणेदेखील एक सलाम आहे", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. इतके वर्ष महाराष्ट्रात राहूनही अमिताभ बच्चन यांना मराठी येत नाही हे समजल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
"पण इतकी वर्षे मुंबईमध्ये राहून सुद्धा मराठी येत नाही हे लाजिरवाणे सुद्धा आहे", असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "रजनीकांतकडून काहीतरी शिका. ते मराठी आहेत. पण, साऊथमध्ये काम करतात तिथे राहतात म्हणून ते त्या भाषा शिकले", अशी कमेंटही केली आहे. "प्रयत्न तरी करा शिकायचा. जास्तीत जास्त मराठी लोकांना रोजगार द्या आपल्या अवतीभवती मराठी लोक असु द्या आपोआप मराठी शिकाल", असंही एकाने म्हटलं आहे.