"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 15:31 IST2025-04-30T15:31:24+5:302025-04-30T15:31:55+5:30
२७व्या वर्षीही काहीही कमवत नसल्याची खंत इराने मुलाखतीत बोलून दाखवली. तर आमिरने लेकीला साथ देत ती करत असलेल्या कामाचा गर्व असल्याचं म्हटलं.

"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
आमिर खानची लेक इरा खान लोकप्रिय स्टारकिड आहे. पण, अभिनय क्षेत्रात करिअर करण्यापेक्षा इराने वेगळा मार्ग निवडला. इरा अगस्तू नावाची फाऊंडेशन चालवते. या माधम्यातून ती गरजू लोकांना मदत करते. पण, २७व्या वर्षीही काहीही कमवत नसल्याची खंत तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवली. तर आमिरने लेकीला साथ देत ती करत असलेल्या कामाचा गर्व असल्याचं म्हटलं.
आमिर खान आणि इराने नुकतीच पिंकविलाला मुलाखत दिली. या मुलाखतीत इरा म्हणाली, "मी २६-२७ वर्षांची आहे. माझ्या आईवडिलांनी माझ्यावर खूप पैसे खर्च केले आहेत. मी एक बेकार मुलगी आहे. मी काहीच करत नाहीये". त्यावर आमिरने मात्र लेकीला सपोर्ट करत एखादा व्यक्ती किती पैसे कमावतो, यावरुन त्याचा दर्जा ठरवत नसल्याचं म्हटलं. "तू पैसे कमावतेस की नाही. ते माझ्यासाठी गरजेचं नाही. तू चांगलं काम करत आहेस. हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे", असं आमिर म्हणाला.
पुढे तो म्हणाला, "पैसा म्हणजे एक कागदाचा तुकडा आहे. हे सगळं काल्पनिक आहे. अशी अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे टॅलेंट आहे. पण, त्यांना पैसे कसे कमवायचे हे माहीत नाही. पण, म्हणून ते युजलेस आहेत का? ते पैसे कमवत नाहीत कारण आपण तयार केलेल्या या सिस्टिममध्ये ते फिट बसत नाही. मी अशा कित्येक लोकांना भेटलो आहे. काही लोक दुसऱ्यांना मदत करतात, पण त्याचे पैसे घेतात. पण, जोपर्यंत तुम्ही लोकांना मदत करत आहात. तिथे पैशाचा विषय येत नाही. एक वडील म्हणून मला तुझा गर्व आहे. सुदैवाने तुझ्या आईवडिलांनी कमवून ठेवलं आहे. त्यामुळे तुला तुझी ऊर्जा पैसे कमावण्यासाठी खर्च करण्याची गरज नाही. त्याऐवजी तू लोकांना मदत कर".