आलिया भट्ट म्हणते,‘माझी स्पर्धा स्वत:शीच!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 17:01 IST2019-09-22T17:00:44+5:302019-09-22T17:01:03+5:30
अलीकडेच एका मुलाखतीत ती म्हणते,‘मी स्वत:शीच स्पर्धा करते. मला कुठे थांबायचे आहे, कुठे नाही हे मी स्वत: ठरवते.’ तिने याच मुलाखतीत तिचा सक्सेस मंत्रा सांगितला आहे.

आलिया भट्ट म्हणते,‘माझी स्पर्धा स्वत:शीच!’
‘स्टुडंट ऑफ द इयर २’ चित्रपटातून दिग्दर्शक करण जोहरने अभिनेत्री आलिया भट्ट हिला लाँच केले. तिच्या टॅलेंट आणि अभिनयाच्या जोरावर तिने विविध चित्रपट केले. या सर्व चित्रपटांमध्ये तिने वेगवेगळया भूमिका साकारल्या. ‘हायवे’,‘कपूर अॅण्ड सन्स’,‘कलंक’ यासारख्या अनेक चित्रपटातून तिने तिचे कौशल्य सिद्ध केले. आता मात्र, अलीकडेच एका मुलाखतीत ती म्हणते,‘मी स्वत:शीच स्पर्धा करते. मला कुठे थांबायचे आहे, कुठे नाही हे मी स्वत: ठरवते.’ तिने याच मुलाखतीत तिचा सक्सेस मंत्रा सांगितला आहे.
हिंदुस्थान टाइम्सच्या एका मुलाखतीत ती म्हणते,‘ मी लहानपणापासूनच स्पर्धा करणारी व्यक्ती आहे. पण मी अशी व्यक्ती नाही जी फक्त रेसमध्ये पळतच राहीन. पण, चित्रपट काही रेस नाही. मला असे वाटते की, कोणतेही कलात्मक काम हे अशा स्पर्धेच्या धावपळीत होऊ शकत नाही. मी स्वत:शीच स्पर्धा करते. अलीकडेच मी एका पुस्तकात वाचले की, प्रत्येकाने स्पर्धा ही स्वत:शीच करावी. आपण एक ध्येय समोर ठेवतो. जर तुम्ही ते ध्येय गाठले तर पुढे तुम्ही काय करणार? मी स्वत:साठी कोणतेही ध्येय ठेवत नाही. मी स्वत: जे करायचे ठरवते त्यातच मी जास्तीत जास्त प्रगती करण्याचा प्रयत्न करते.’
ती पुढे म्हणाली की,‘अनेकदा अशीही चर्चा होते, ती पहिली , तो बारावा आणि तो चौदावा. पण अशी कोणती रँकिंग नसते. शेवटी एक कलाकार म्हणून तुम्हाला त्या ठराविक चित्रपटासाठी आठवले जाते. आकड्यांचे गणित सर्व कलाकारांना आवडते असे नाही. माझ्यासाठी हे आकडे महत्त्वाचे नाहीत. मी माझ्या अभिनयावर जास्त लक्षकेंद्रित करते. चाहत्यांना माझा अभिनय कसा आवडेल? याकडे मी लक्ष देते.’