२७ वर्षांनी मोठ्या सलमान खानसोबत काम करण्याबद्दल आलिया भट म्हणते...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 12:00 IST2019-04-09T11:59:06+5:302019-04-09T12:00:19+5:30
संजय लीला भन्साळींच्या प्रत्येक चित्रपटाची जोरदार चर्चा होते. भन्साळींचा ‘इंशाअल्लाह’ हा आगामी चित्रपटही सध्या जाम चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे, या चित्रपटात लीड भूमिकेत असलेली सलमान खान आणि आलिया भटची जोडी.

२७ वर्षांनी मोठ्या सलमान खानसोबत काम करण्याबद्दल आलिया भट म्हणते...!
संजय लीला भन्साळींच्या प्रत्येक चित्रपटाची जोरदार चर्चा होते. भन्साळींचा ‘इंशाअल्लाह’ हा आगामी चित्रपटही सध्या जाम चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे, या चित्रपटात लीड भूमिकेत असलेली सलमान खान आणि आलिया भटची जोडी. होय, भन्साळींनी ‘इंशाअल्लाह’साठी सलमान आणि आलियाला फायनल केले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. सलमान आलियापेक्षा २७ वर्षांनी मोठा आहे. त्यामुळे या दोघांच्या जोडीवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. अगदी यावरून आलियाला ट्रोलही केले. पडद्यावर ही जोडी फ्लॉप होणार, अशा एक ना अनेक प्रतिक्रिया लोकांनी दिल्या. आता या सगळ्यांवर आलियाची प्रतिक्रिया आली आहे.
होय, सलमानसोबत आलिया झळकणार म्हटल्यावर लोकांनी आलियाला ट्रोल करणे सुरु केले. पण आलियाचे मानाल तर, हे ट्रोल करणे म्हणजेही एक्साइटमेंटचे दुसरे नाव आहे.
‘सलमानसोबत काम करणार म्हटल्यावर मला ट्रोल केले जातेय. पण माझ्यामते, ही सुद्धा एकप्रकारची एक्साइटमेंट आहे. टीकेऐवजी मला याबद्दल लोकांमधील उत्सुकताच अधिक जाणवली. माझे स्वत:चे सांगायचे झाल्यास, मी यामुळे जराही चिंतेत नाही. सलमान व भन्साळी सरही यामुळे चिंतेत असतील, असे मला वाटत नाही. संजय सरांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिलेत. त्यांनी स्टारकास्ट निवडली असेल तर त्यामागेही त्यांचा काही उद्देश असेल. माझ्यामते, संजय सर आणि त्यांच्या दूरदृष्टीवर आपण सर्वांनी विश्वास ठेवायला हवा,’असे आलिया म्हणाली.
लवकरच आलिया धर्मा प्रॉडक्शनच्या ‘कलंक’मध्ये दिसणार आहे. यानंतर अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये ती झळकणार आहे. यात ती बॉयफ्रेन्ड रणबीर कपूरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसेल. याशिवाय धर्मा प्रॉडक्शनचाच ‘तख्त’ आणि ‘बाहुबली’ फेम एस. एस. राजमौली यांचा ‘आरआरआर’ हा चित्रपटही आलियाने साईन केला आहे.