'पागल हो गया है क्या?', अक्षय खन्ना कास्टिंग डायरेक्टरवर चिडलाच; नक्की काय घडलेलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 11:57 IST2026-01-02T11:54:10+5:302026-01-02T11:57:46+5:30
'धुरंधर' मध्ये रहमान डकैतची ऑफर मिळाली तेव्हा...

'पागल हो गया है क्या?', अक्षय खन्ना कास्टिंग डायरेक्टरवर चिडलाच; नक्की काय घडलेलं?
५ डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या 'धुरंधर'ची महिनाभरानंतरही चर्चा आहे. अजूनही सिनेमा थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय. अक्षय खन्नाचा रहमान डकैतच्या भूमिकेतला डान्स, स्वॅग हे सुपरहिट झालं. पण जेव्हा अक्षयला रहमान डकैतची भूमिका ऑफर झाली तेव्हा त्याला धक्काच बसला होता. या भूमिकेत आपण कसे काय शोभून दिसू असं त्याला वाटलं होतं. कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा यांनी नुकतीच अक्षयची पहिली रिअॅक्शन काय होती याचा खुलासा केला.
इंडिया टुडेशी बोलताना मुकेश छाबडा म्हणाले, "मी सिनेमासाठी कास्टिंग सुरु केलं त्याआधीच रणवीर सिंहला मेकर्सने फायनल केलं होतं. माझ्यावर इतर भूमिकांच्या कास्टिंगची जबाबदारी होती. कास्टिंगचं अगदी छोट्यातलं छोटं कामही खूप लक्षपूर्वक केलं गेलं होतं. सिनेमात अक्षय खन्नाला घ्यायचंच असा माझा विचार होता. मात्र अक्षय सिनेमाला होकार देईल यावर मेकर्सला विश्वासच नव्हता. तसंच त्याला या सिनेमासाठी मनवणंही कठीणच होतं. कारण तो खूप निवडक सिनेमे करतो. पण मी मेकर्सला सांगितलं की अक्षय खन्ना हा सिनेमा नक्की करेल आणि नंतर सगळ्यांनीच होकार दिला."
ते पुढे म्हणाले, "खरं सांगायचं तर मी अजूनपर्यंत छावा बघितला नव्हता. पण मी अक्षयला फोन केला. आधी तर तो माझ्यावर ओरडला. 'पागल हो गया है क्या?' मग मी त्याला म्हणाले की कमीत कमी माझं ऐकून तर घे. मी त्याला खूप समजावलं आणि एकदा भेटण्यासाठी मनवलं. मी अक्षयला ऑफिसमध्ये बोलवलं. आदित्य धरही आला. अक्षय म्हणाला,'मी इथे राहतच नाही. बोल कुठे यायचंय? मग तो आला आणि चार तास बसला होता. त्याने सगळं ऐकलं. सिगारेट ओढत होता. आमचं सगळं बोलणं ऐकल्यानंतर तो म्हणाला, 'अरे यार, हे तर मस्त आहे. मजा येईल'.