Video: 'बॉर्डर २' मध्ये शेवटी दिसली अक्षय खन्नाची झलक, थिएटरमध्ये प्रेक्षकांनी केला एकच जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 12:11 IST2026-01-26T12:09:40+5:302026-01-26T12:11:59+5:30
'बॉर्डर २' चित्रपटाच्या एका खास सीनसाठी अभिनेता अक्षय खन्ना पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसला आहे. अक्षय खन्नाला पाहताच चाहत्यांनी थिएटरमध्ये एकच जल्लोष केला आहे.

Video: 'बॉर्डर २' मध्ये शेवटी दिसली अक्षय खन्नाची झलक, थिएटरमध्ये प्रेक्षकांनी केला एकच जल्लोष
सनी देओल स्टारर 'बॉर्डर २' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने केवळ कमाईचेच रेकॉर्ड मोडले नाहीत, तर प्रेक्षकांना भावुक करण्यातही यश मिळवले आहे. आता या चित्रपटाबाबत एक मोठी आणि रंजक माहिती समोर आली आहे. चित्रपटाच्या एका खास सीनसाठी अभिनेता अक्षय खन्ना पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसला आहे. अक्षय खन्नाला पाहताच चाहत्यांनी थिएटरमध्ये एकच जल्लोष केला आहे.
१९९७ मध्ये आलेल्या 'बॉर्डर' चित्रपटात अक्षय खन्नाने 'धर्मवीर' ही अविस्मरणीय भूमिका साकारली होती. 'बॉर्डर २' मध्ये निर्मात्यांनी चित्रपट संपल्यावर अक्षय खन्नाला पुन्हा मोठ्या पडद्यावर आणलं आहे. सनी देओल जेव्हा आपल्या सहकाऱ्यांना मानवंदना देत असतो तेव्हा त्याला त्याच्या जुन्या सहकाऱ्यांची आठवण येते असं दृश्य आहे. त्या दृश्यात अक्षय खन्ना पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसतो. केवळ अक्षयच नव्हे तर 'बॉर्डर'मधील सुनील शेट्टी, सुदेश बेरी, पुनीत इस्सार यांचीही झलक मोठ्या पडद्यावर दिसते.
That glimpse of Assistant Commandant Bhairon Singh, Lt. Dharam Veer, Subedar Ratan Singh and Naib Subedar Mathura Das in the end credits 🥺🇮🇳🙏 #Border2#SunnyDeolpic.twitter.com/Z76Wla6voF
— Kashinath 2.0 (@TheDeolsFC) January 25, 2026
अक्षय खन्नाला पाहताच थिएटरमध्ये सर्वांना त्याच्या 'धुरंधर' सिनेमाची आठवण आली. अनेकांनी 'रहमान डकैतsss' च्या घोषणा केल्या. त्यामुळे अक्षय खन्नाच्या रहमान डकैतने प्रेक्षकांच्या मनावर किती गारूड निर्माण केलंय, याचा अनुभव येतोय. अक्षय खन्ना आणि इतर कलाकारांची पडद्यावर झालेली एन्ट्री ही AI चा वापर करुन तयार केली आहे, असंही बोललं जात आहे. याबद्दल निश्चित माहिती नाही. परंतु तरीही मूळ 'बॉर्डर' सिनेमाच्या कलाकारांना पुन्हा मोठ्या पडद्यावर बघणं हा निश्चित प्रेक्षकांसाठी सुखद धक्का आहे.
सनी देओलची प्रमुख भूमिका असलेल्या 'बॉर्डर २'ने अवघ्या तीन दिवसांत १२१ कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटात वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अनुराग सिंगने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर हा सिनेमा आधारीत आहे.