अक्षय खन्नाला रहमान डकैतचा लूक आधी आवडलाच नव्हता? कॉस्च्युम डिझायनरचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 12:26 IST2025-12-25T12:25:38+5:302025-12-25T12:26:24+5:30
रहमान डकैतचा फ्लिपराचीच्या डान्समधला लूकही व्हायरल झाला. त्याबद्दल कॉस्चुम डिझायनर म्हणाली...

अक्षय खन्नाला रहमान डकैतचा लूक आधी आवडलाच नव्हता? कॉस्च्युम डिझायनरचा खुलासा
अभिनेता अक्षय खन्नाने थिएटर आणि सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अचानकच त्याच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे. 'छावा', 'धुरंधर' सिनेमांमध्ये खलनायक साकारुनही तो हिरोसारखाच प्रसिद्धीझोतात आला आहे. 'धुरंधर'मध्ये रहमान डकैतच्या भूमिकेत तो शोभून दिसला आहे. त्याची स्टाईल, स्वॅग तुफान व्हायरल झालंय. पण तुम्हाला माहितीये का अक्षयला त्याचा रहमान डकैतचा लूक सुरुवातीला आवडलाच नव्हता. सिनेमाच्या कॉस्च्युम डिझानयरने नुकताच हा खुलासा केला.
डिजीटल कॉमेन्ट्रीशी बोलताना कॉस्च्युम डिझायनर स्मृती चौहान म्हणाली, "सुरुवातीला स्ट्रेट फॉरवर्ड प्लॅन होता. अक्षयला जास्त करुन पठानी लूक द्यायचा होता. पण त्याला काहीतरी कमी असल्यासारखं वाटत होतं. आम्ही त्याला कुर्ता-जीन्स दिलं. त्याला लूकबद्दल काय वाटतंय हेही आम्हाला जाणून घ्यायचं होतं. त्याने खूप महत्वाची गोष्ट सांगितली की,'आपण हे विसरुन चालणार नाही की तो सुद्धा गल्लीबोळांमधून आलेला आहे'. अक्षयच्या त्या सल्ल्याने भूमिकेचा संपूर्ण व्हिजुअल आर्कच बदलला. त्याचा बदलता वेष हा त्याच्या रहमान डकैत बनण्यापर्यंतचा प्रवासाचं वर्णन करतो. आम्ही त्याला लिनन आणि डेनिम तेसिल्क वूल पठानी असं सगळंच दिलं."
ती पुढे म्हणाली, "ही प्रक्रिया इतकी सोपी नव्हती. अक्षयला आधी तर या लूकबद्दल इतकी खात्री वाटत नव्हती. त्याने पहिली लूक टेस्ट दिली आणि काही आठवड्यांनंतर आमची मीटिंग झाली. आपण हे केलं पाहिजे असं वाटत नाही हे तो स्पष्ट बोलला आणि आम्हीही ते मान्य केलं. रहमान डकैतही छोट्या गल्लीतून आला आहे त्यामुळे त्याच्या वाईबमध्ये एक कठोरता दिसली पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं."
रहमान डकैतचा फ्लिपराचीच्या डान्समधला लूकही व्हायरल झाला. त्याबद्दल स्मृती म्हणाली,"तो लूक ऐनवेळी फायनल केला होता. आधी तर सर्वांनी काळं घालायचं असा प्लॅन होता. पण तुम्ही ओरिजनल बलुच लोकांना पाहिलं तर ते पांढरं जास्त घालतात. आदित्य सरांनीही पांढऱ्यालाच पसंती दिली. पण हे खूप आव्हानात्मक होतं कारण डझनभर डान्सर तळपत्या उन्हात असणार होते ज्यामुळे व्हिजुअल बॅलन्स करणं कठीण होतं. मग आम्ही ठरवलं की अक्षय खन्ना पूर्ण ब्लॅक लूकमध्ये असेल आणि बाकी डान्सर पांढरा कुर्ता घालतील. आदित्य सरांचंही हेच म्हणणं होतं की रहमान डकैतची एन्ट्री अशी असली पाहिजे की लोक स्तब्ध झाले पाहिजे. आम्हाला त्यात यश आलेलं आज दिसत आहे."