"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 13:38 IST2025-10-03T13:37:36+5:302025-10-03T13:38:18+5:30
नुकत्याच एका सायबर अवेअरनेस कार्यक्रमात अक्षय कुमारने एक धक्कादायक अनुभव सांगितला.

"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
Cyber Awareness Campaign: बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आपल्या व्यावसायिक आयुष्याबद्दल तो जितका मोकळेपणाने बोलतो, तितकाच तो आपल्या खासगी आयुष्याबद्दल आणि विशेषतः मुलांबद्दल खूप प्रोटेक्टिव्ह असतो. पण, नुकतंच अक्षय कुमारच्या लेकीसोबत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली, ज्यामुळे त्याने सायबर क्राईमच्या धोक्याबाबत पालकांना सावध केले आहे.
नुकत्याच एका सायबर अवेअरनेस कार्यक्रमात अक्षय कुमारने एक धक्कादायक अनुभव सांगितला. अक्षय कुमारने खुलासा केला की, काही महिन्यांपूर्वी त्याची मुलगी नितारा व्हिडीओ गेम खेळत असताना एक घटना घडली. ऑनलाइन गेम्समध्ये अनोळखी लोकांशी गप्पा मारता येतात. नितारा एका अनोळखी व्यक्तीसोबत खेळत असताना, सुरुवातीला अगदी सामान्य मेसेज येत होते, जसे की 'थँक्यू', 'वेल प्लेड', 'तू खूप छान खेळलीस'.
गप्पा सुरू असताना त्या व्यक्तीने निताराला विचारले की ती कुठून आहे. तिने 'मुंबई' असे उत्तर दिले. 'तू मेल आहेस की फिमेल?' असे विचारल्यावर तिने 'फिमेल' असे सांगितले. इथपर्यंत सर्व ठीक होते. मात्र, यानंतर त्या अनोळखी व्यक्तीने थेट मेसेज केला, “तू मला आपली न्यूड पिक्चर पाठवशील का?”. हा मेसेज वाचताच निताराने लगेच गेम बंद केला आणि हा संपूर्ण प्रकार त्वरित तिची आई ट्विंकल खन्नाला सांगितला. अक्षय म्हणाला की, तिने ही घटना लगेचच आईला सांगितली, ही खूप चांगली गोष्ट होती".
सायबर क्राईमपासून सावध राहण्याचे आवाहन
या घटनेवरून अक्षय कुमारने सायबर क्राईमपासून पालकांना सावध केले. तो म्हणाला, "याच पद्धतीने सगळं सुरू होतं. हेसुद्धा सायबर क्राईमचाच एक भाग आहे. अशा प्रकारे लोक मुलांना जाळ्यात अडकवतात, नंतर पैसे उकळतात (एक्स्टॉर्शन). यानंतर अनेक प्रकारच्या घटना घडतात, काही प्रकरणांमध्ये लोकांनी आत्महत्याही केली आहे". अक्षयने पालकांना आपल्या मुलांच्या ऑनलाइन ॲक्टिव्हिटीकडे लक्ष देण्याचे आणि त्यांना अशा धोक्यांपासून सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले आहे.
अक्षय कुमारची 'कार्बन कॉपी' आहे नितारा
अक्षय कुमारसाठी त्याची दोन्ही मुलं सर्वस्व आहेत. तो त्याच्या पत्नीवर जितकं प्रेम करतो किंबहुना त्यापेक्षाही अधिक तो त्याच्या मुलांवर प्रेम करतो. त्यांच्या मुलाचं नाव आरव कुमार असं असून मुलीचं नाव नितारा कुमार असं आहे. तारा ही १२ वर्षांची आहे, तिचा जन्म २५ सप्टेंबर २०१२ रोजी झाला होता. नितारा तिच्या वडिलांची म्हणजेच अक्षय कुमारची 'कार्बन कॉपी' आहे असे अनेक चाहते म्हणतात. नितारा क्वचितच सार्वजनिक ठिकाणी दिसते. पण जेव्हा जेव्हा ती दिसते, तेव्हा तिच्या गोंडसपणाने ती सर्वांचे मन जिंकते.