'या' क्षेत्रात अक्षयचा मुलगा घेतोय शिक्षण, खिलाडी कुमार म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 15:56 IST2025-09-29T15:54:05+5:302025-09-29T15:56:25+5:30
वयाच्या १५ व्या वर्षीच अक्षय कुमारच्या लेकाने सोडलं होतं घर, आरवच्या सवयी वाचून व्हाल थक्क!

'या' क्षेत्रात अक्षयचा मुलगा घेतोय शिक्षण, खिलाडी कुमार म्हणाला...
खिलाडी कुमार म्हणून बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या अक्षय कुमारला (Akshay Kumar) आणखी वेगळ्या ओळखीची गरज नाही. चाहते त्याच्या चित्रपटांची नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात. अक्षय कुमार हा इंडस्ट्रीतील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. अक्षय हा इंडस्ट्रीतील सर्वात शिस्तबद्ध कलाकारांपैकी एक मानला जातो. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आपल्या कुटुंबातील शिस्तीचं आणि पत्नी ट्विंकल खन्नाचं गुपित उघड केलं आहे. तसेच, मुलगा आरव चित्रपटसृष्टीत येणार नसल्याचेही त्याने स्पष्ट केले.
एबीपी न्यूजशी संवाद साधताना अक्षय कुमार म्हणाला, "मी खूप कडक शिस्तीचा नाही, शिस्त लावण्याची संपूर्ण जबाबदारी माझ्या पत्नीची आहे, ती खूप गंभीर आहे. ती मला, नितारा (मुलगी) आणि आरव (मुलगा) आम्हा तिघांना शिस्तीत ठेवते".
मुलगा आरवबद्दल बोलताना अक्षय म्हणाला, "मी माझ्या मुलाचा मित्र आहे. तो २३ वर्षांचा झाला आहे. तो लवकर मोठा झाला. तो सध्या शिक्षण घेत आहे आणि अभ्यास करण्यात व्यस्त आहे. त्याला कोणत्याही वाईट सवयी नाहीत. तो ट्विंकलसारखा आहे, कारण ट्विंकलसुद्धा सतत अभ्यास करत असते"
भविष्यात आरव चित्रपटसृष्टीत येणार का, या प्रश्नावर अक्षयने स्पष्ट केले की, "त्याला मनोरंजनसृष्टीत करिअर करायचे नाही. त्याने मला स्पष्ट सांगितले आहे की मला या क्षेत्रात यायचे नाही. मी त्याला माझ्या प्रोडक्शन कंपनीत काम करण्यासाठीसुद्धा सुचवले, पण त्याला ते करायचे नाही. त्याला फॅशन क्षेत्रात काम करायचे आहे. त्याला डिझायनर बनायचे आहे". सध्या आरव लंडनमध्ये फॅशन डिझाइनचा कोर्स पूर्ण करत आहे. तो प्रसिद्धीझोतापासून कायमच दूर राहतो. अक्षयने सांगितले की, "आरव त्याच्या आयुष्यात आनंदी आहे आणि तो त्याच्या निर्णयाने खूप खूश आहे".