जेन झींना मराठी सिनेमाशी कसं जोडाल? अक्षय कुमारच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, "थिएटर ही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 14:17 IST2025-10-07T14:16:06+5:302025-10-07T14:17:23+5:30
"आज अशी स्थिती आहे की...", मराठी सिनेमावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य

जेन झींना मराठी सिनेमाशी कसं जोडाल? अक्षय कुमारच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, "थिएटर ही..."
मुंबईत आयोजित FICCI FRAMES 2025 कार्यक्रमात अभिनेता अक्षय कुमारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यामध्ये अक्षयने मुख्यमंत्र्यांना मुंबईतील विकास, सिनेमा आणि एकंदर राज्याच्या विकासाबद्दल प्रश्न विचारले. सध्या मराठी सिनेमांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तरी जेन झी म्हणजेच तरुण मंडळींना मराठी सिनेमाकडे कसे आकर्षित कराल किंवा जेन झींना मराठी सिनेमाशी कसं जोडाल? असा प्रश्न अक्षय कुमारने मुख्यमंत्र्यांना विचारला. त्यावर ते काय म्हणाले वाचा.
मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मराठी थिएटर ही मराठी इंडस्ट्रीची जमेची बाजू आहे. मराठी थिएटर कायम नाविन्यपूर्ण राहिलं आहे. त्याने अभिव्यक्तीची, सर्जनशीलतेचा आदर्श ठेवला आहे. मराठी प्रेक्षकही खूप उत्साही असतात. इतके मराठी नाटक येतात आणि आजही नाटक बघायला गर्दी असते. हाऊसफुलचा बोर्ड लागतो. अनेकांनी १० हजार प्रयोगांचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. हीच क्रिएटिव्हिटी मराठी सिनेमांमध्येही दिसते."
ते पुढे म्हणाले, "'नटरंग', 'दशावतार' सारखे सिनेमे आहेत. जुन्या थीम्स जसे की सखाराम बाइंडर सारखे नाटक पुन्हा येणे या गोष्टी जेन झींनाही आवडत आहेत. जेन झीही आता मराठी नाटक, सिनेमाला जोडले जात आहेत. एकेकाळी मराठी फिल्म्सला थिएटर मिळत नव्हती. एखादा बडा हिंदी सिनेमा असेल तर मराठी सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलावी लागायची. आज अशी स्थिती आहे की एकाच दिवशी २ मराठी सिनेमे रिलीज होत आहेत आणि दोन्ही ब्लॉकबस्टर होत आहेत. हे फार मोठं काम होत आहे. मराठी सिनेमाला पाठिंबा देण्याचा आमच्या सरकारचाही प्रयत्न आहे. अशा काही योजनाही आम्ही आणत असतो. पण आज तुम्ही मला एक मंत्र दिला आहे. जेन झी विथ मराठी फिल्म्स यावर मी नक्कीच काम करेन. हा नवीन मंत्र आज मला मिळाला आहे."