पुरुषांनो 'ही' चाचणी कराच! अक्षय कुमारकडून कळकळीची विनंती; म्हणाला "३ पैकी एका पुरुषाला याचा धोका..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 16:24 IST2026-03-16T16:24:20+5:302026-03-16T16:24:48+5:30
वडिलांच्या आठवणीने अक्षय कुमार भावुक, पुरुषांना केली 'ही' जीव वाचवणारी चाचणी करण्याची विनंती

पुरुषांनो 'ही' चाचणी कराच! अक्षय कुमारकडून कळकळीची विनंती; म्हणाला "३ पैकी एका पुरुषाला याचा धोका..."
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा त्याच्या अभिनयासोबतच फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. वयाच्या ५८ व्या वर्षीही अक्षय कुमार जबरदस्त फिट आहे. संपुर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये तो पार्टीज आणि अल्कोहलपासून दूर राहण्यासाठी ओळखला जातो. नुकत्याच पार पडलेल्या 'इंडिया टुडे'च्या एका कार्यक्रमात अक्षयने आपल्या वडिलांच्या निधनाचे कारण सांगताना एक अत्यंत महत्त्वाची आरोग्यविषयक माहिती दिली. आपल्या वडिलांना गमावल्याचे दुःख व्यक्त करताना, अक्षयने सर्व पुरुषांना PSA (प्रोस्टेट-स्पेसिफिक अँटीजेन) चाचणी करण्याचे आवाहन केले आहे.
कार्यक्रमात बोलताना अक्षय कुमार अत्यंत भावूक झाला. तो म्हणाला, "मी माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती, माझे वडील गमावले. वयाच्या ६७ व्या वर्षी ते आम्हाला सोडून गेले. त्यांच्या निधनाचे एक प्रमुख कारण म्हणजे आम्हाला त्या वेळी PSA चाचणीच्या महत्त्वाबद्दल माहिती नव्हती. जर वयाच्या ५०-५५ नंतर ही चाचणी नियमित केली असती, तर त्यांचे प्राण वाचले असते". अक्षयचे वडील हरी ओम भाटिया यांचे २००० मध्ये प्रोस्टेट कर्करोगाने निधन झाले होते.
काय आहे ही PSA चाचणी?
अक्षयने केवळ आवाहनच केले नाही, तर ही चाचणी का महत्त्वाची आहे हे देखील स्पष्ट केले. PSA चाचणी ही रक्तातील प्रोस्टेट-विशिष्ट प्रतिजन (PSA) चे प्रमाण मोजणारी एक सोपी चाचणी आहे. रक्तातील या घटकाचे वाढलेले प्रमाण हे प्रोस्टेट कर्करोगाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. लवकर निदान झाल्यास या कर्करोगावर प्रभावी उपचार करणे शक्य होते.
"प्रत्येक ३ पैकी एका पुरुषाला धोका"
अक्षयने धक्कादायक आकडेवारी मांडत सर्वांना सावध केले. तो म्हणाला, "प्रोस्टेट कर्करोग हा अतिशय सामान्य आहे. आज प्रत्येक ३ पैकी एका पुरुषाला याचा धोका असू शकतो. त्यामुळे ५० वर्षांवरील प्रत्येक पुरुषाने वर्षातून एकदा तरी ही चाचणी करणे अनिवार्य आहे. तुम्ही केवळ स्वतःचाच नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा आनंद वाचवू शकता".