दृश्यम 2 येणार प्रेक्षकांच्या भेटीस, वाचा कोण असणार मुख्य भूमिकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 14:56 IST2021-02-25T14:50:43+5:302021-02-25T14:56:06+5:30
दृश्यम या चित्रपटाची कथा जेथे संपली होती, तिथून दृश्यम 2 या चित्रपटाची कथा सुरू होणार आहे.

दृश्यम 2 येणार प्रेक्षकांच्या भेटीस, वाचा कोण असणार मुख्य भूमिकेत
दृश्यम या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले होते. त्यानंतर या चित्रपटाचे विविध भाषेत रिमेक बनवण्यात आले होते. हिंदीमध्ये देखील हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. यात अजय देवगणची मुख्य भूमिका होती. या चित्रपटातील सस्पेन्स लोकांना प्रचंड आवडला होता. त्यामुळे या चित्रपटाचा दुसरा भाग येणार हे कळल्यावर लोकांच्या मनात या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती.
मोहनलाल यांची मुख्य भूमिका असलेल्या दृश्यम 2 सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. हा मल्याळम चित्रपट असला तरी अनेक जण सबटायटलच्या मदतीने हा चित्रपट पाहात आहेत. पण सबटायटल्स वाचून चित्रपट पाहाणे काहींना आवडत नाही. त्यामुळे दृश्यम 2 हा चित्रपट हिंदीत कधी येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. प्रेक्षकांसाठी आता एक गुड न्यूज आहे. मोहनलाल यांच्या दृश्यम 2 या चित्रपटाचे हक्क कुमार मंगत या निर्मात्याने घेतले असून लवकरच ते या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवणार आहेत. हक्क विकत घेण्यासाठी त्यांनी मोठी रक्कम मोजली असल्याची चर्चा रंगली आहे.
दृश्यम या चित्रपटाची कथा जेथे संपली होती, तिथून दृश्यम 2 या चित्रपटाची कथा सुरू होणार आहे. दृश्यम या चित्रपटाप्रमाणेच अजय देवगण, तब्बू यांच्यादेखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. या दोघांनी या चित्रपटासाठी होकार दिला असल्याचे म्हटले जात आहे. २०२१ च्या शेवटी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून २०२२ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दृश्यम या चित्रपटाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले होते. पण काहीच महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले.