'तान्हाजी'च्या प्रीक्वेलची घोषणा! अजय देवगणने शेअर केला 'बाल तानाजी'चा टीझर; चाहत्यांना दिलं सरप्राईज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 15:24 IST2026-01-19T15:24:30+5:302026-01-19T15:24:52+5:30
बाल तानाजी'सिनेमा नावाप्रमाणेच तानाजी मालुसरेंच्या बालपणीची कथा असणार आहे.

'तान्हाजी'च्या प्रीक्वेलची घोषणा! अजय देवगणने शेअर केला 'बाल तानाजी'चा टीझर; चाहत्यांना दिलं सरप्राईज
अजय देवगणच्या सुपरहिट सिनेमांपैकी एक 'तानाजी: द अनसंग वॉरियर' सिनेमाला ६ वर्ष झाली आहेत. छत्रपती शिवरायांचा महत्वाचा शिलेदार तानाजी मालुसरेंवर सिनेमा आधारित होता. १० जानेवारी २०२० साली हा सिनेमा आला होता. आता इतक्या वर्षांनंतर अजय देवगणने या सिनेमाच्या प्रीक्वेलची घोषणा केली आहे. 'बाल तानाजी' असं सिनेमाचं नाव आहे. विशेष म्हणजे हा पहिलाच एआय ओरिजिनल सिनेमा असणार आहे.
'बाल तानाजी'सिनेमात नावाप्रमाणेच तानाजी मालुसरेंच्या बालपणीची कथा असणार आहे. छोट्या गावातील एक छोटा मुलगा वीर योद्धा कसा बनतो याची ही कहाणी आहे. अजय देवगणने त्याच्या आगामी 'बाल तानाजी' या एआय ओरिजिनल चित्रपटाचा 'फर्स्ट लुक' सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा चित्रपट इतर चित्रपटांपेक्षा वेगळा असणार आहे. याचे मुख्य आकर्षण म्हणजे यामध्ये वापरण्यात आलेले AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञान. भारतीय चित्रपटसृष्टीत अशा प्रकारे ऐतिहासिक कथेसाठी मोठ्या प्रमाणावर AI चा वापर करण्याचा हा एक धाडसी प्रयोग मानला जात आहे. लहानपणीचे तान्हाजी: या चित्रपटात तानाजी मालुसरे यांच्या लहानपणीचा प्रवास, त्यांचे युद्धकौशल्य, ते नेमके कसे घडले हे दाखवण्यात येणार आहे.
या टीझरमध्ये बाल तानाजींच्या डोळ्यांतील चमक आणि हातात घेतलेली तलवार पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. लेन्स वॉल्ट स्टु़डिओज या नवीन तंत्रज्ञानावर आधारित कंपनी अंतर्गत या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. अजय देवगण आणि दानिश देवगणने मिळून हे प्रोजेक्ट लाँच केलं आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना अजय देवगण म्हणाला, "आपल्या इतिहासातील महान योद्ध्यांच्या कथा नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. 'बाल तानाजी' हे त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे, जिथे तंत्रज्ञान आणि इतिहास यांचा संगम दिसेल."
'तानाजी' चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारावर मोहर उमटवली होती, त्यामुळे आता 'बाल तानाजी' या 'एआय ओरिजिनल' चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. हा चित्रपट लहान मुलांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरेल, यात शंका नाही.