धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 15:34 IST2025-11-19T15:33:11+5:302025-11-19T15:34:45+5:30
श्री सत्य साईबाबांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला ऐश्वर्या राय बच्चनने केलं भाषण

धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
आंध्रप्रदेश येथील पुट्टपर्थी येथे श्री सत्य साई बाबांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांचीही हजेरी होती. यावेळी ऐश्वर्या रायने भाषण केलं. सत्य साईबाबांनी दिलेली शिकवण सांगितली. तसंच तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडत आशीर्वादही घेतला.
ऐश्वर्या राय बच्चन भाषणात म्हणाली, "सत्य साई बाबांच्या या पवित्र जन्मशताब्दी सोहळ्याला उपस्थित राहून माझं मन श्रद्धा आणि भक्तीभावाने भरुन आलं आहे. त्यांचे विचार, अनुशासन, समर्पण आणि भक्तीने आजही जगभरातील लाखो जणांचं मन बदलण्याचं काम होत आहे."
ती पुढे म्हणाली, "पंतप्रधान नरेंद्र मोदी या विशेष प्रसंगी इथे उपस्थित राहिले यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करते. मी तुमचे ज्ञानवर्धक, प्रभावशाली आणि प्रेरणादायक शब्द ऐकण्यासाठी उत्सुक आहे. तुमची उपस्थिती या समारोहामध्ये प्रेरणा आणि पवित्रतेला जोडते. सेवा हेच खरं नेतृत्व आहे आणि मानवसेवा हीच ईश्वर सेवा आहे हा सत्य साईबाबांचा संदेशाची आठवण करुन देते. सगळ्यांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा. जगात एकच जात आहे ती म्हणजे माणूसकी. एकच धर्म आहे तो म्हणजे प्रेम. एकच भाषा आहे ती म्हणजे मनाची भाषा. आणि एकच देव आहे जो सगळीकडे आहे."
ऐश्वर्या अनेक वर्षांपासुन श्री सत्य साईबाबांची अनुयायी आहे. ऐश्वर्याचे आईवडीलही त्यांचे भक्त होते. जेव्हा ऐश्वर्याचा जन्म झाला तेव्हाही ते सत्य साईबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. इतकंच नाही तर ऐश्वर्या सत्य साईबाबांच्या बाल विकास शाळेतील विद्यार्थिनीही राहिली आहे. तिथे तिने धर्मशास्त्रचं शिक्षण घेतलं. मिस वर्ल्ड खिताब पटकावल्यानंतर ती पुट्टपर्थी येथे साईबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आली होती.