आधी 'दृश्यम ३' नाकारला, आता अक्षय खन्नाच्या हाती लागला बॉलिवूडचा मोठा सिनेमा? पुन्हा एकदा खलनायक साकारणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 12:03 IST2026-02-17T11:59:34+5:302026-02-17T12:03:40+5:30
काहीच दिवसांपूर्वी अक्षयने 'दृश्यम ३' नाकारल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. आता 'दृश्यम ३' मधून बाहेर गेलेल्या अक्षयच्या हातात मोठा प्रोजेक्ट लागला आहे.

आधी 'दृश्यम ३' नाकारला, आता अक्षय खन्नाच्या हाती लागला बॉलिवूडचा मोठा सिनेमा? पुन्हा एकदा खलनायक साकारणार
अक्षय खन्ना हा सध्या बॉलिवूडमधील चर्चेतील अभिनेता. 'धुरंधर' सिनेमामुळे अक्षयला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. 'धुरंधर' सिनेमात अक्षयने साकारलेल्या रहमान डकैतच्या भूमिकेने प्रेक्षकांचं मन जिंकलं. काहीच दिवसांपूर्वी अक्षयने 'दृश्यम ३' नाकारल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. आता 'दृश्यम ३' मधून बाहेर गेलेल्या अक्षयच्या हातात मोठा प्रोजेक्ट लागला आहे. या सिनेमाचं नाव आहे 'तुंबाड २'.
२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि प्रेक्षकांना थरारक अनुभव देणाऱ्या 'तुंबाड' चित्रपटाच्या सीक्वलची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अभिनेता आणि निर्माता सोहम शाहने काही महिन्यांपूर्वी 'तुंबाड २'ची अधिकृत घोषणा केली होती. आता या चित्रपटातील एका महत्त्वाच्या कास्टिंग अपडेटने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. ताज्या अहवालानुसार, चित्रपटातील मुख्य खलनायकाच्या भूमिकेसाठी बॉलिवूडचे दोन दिग्गज अभिनेते अक्षय खन्ना आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या नावांची चर्चा आहे.
'झूम'च्या रिपोर्टनुसार, 'तुंबाड २' च्या निर्मात्यांना या भागात एक अतिशय शक्तिशाली खलनायक हवा आहे. हा खलनायक केवळ भीती निर्माण करणारा नसून त्याचा प्रेक्षकांवर मानसिक परिणाम होईल, अशी निर्मात्यांना आशा आहे. त्यामुळेच अक्षय खन्ना आणि नवाजुद्दीन सिद्दीकी या दोघांपैकी एका नावाची 'तुंबाड २' साठी चर्चा आहे. अक्षय खन्नाने अलीकडेच 'दृश्यम २' आणि 'धुरंधर' सारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. दुसरीकडे, नवाजुद्दीन सिद्दीकी 'गँग्स ऑफ वासेपूर' आणि 'रमन राघव २.०' सारख्या चित्रपटांतील नकारात्मक भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. आता या दोघांपैकी कोणाची वर्णी लागते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
जेव्हा 'तुंबाड' प्रदर्शित झाला होता, तेव्हा सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. मात्र, हळूहळू या चित्रपटाला 'कल्ट' दर्जा प्राप्त झाला. २०२४ मध्ये जेव्हा हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला, तेव्हा त्याने बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम प्रस्थापित केले. याच यशानंतर सोहम शाहने सीक्वलचे काम वेगाने सुरू केले आहे. अद्याप निर्मात्यांनी या कास्टिंगबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु या बातमीमुळे 'तुंबाड २' बाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.