'धुरंधर २'मध्ये होती मोठी चूक, ११ दिवसांनंतर आदित्य धरने सुधारली; तुमच्या आली होती का लक्षात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 13:40 IST2026-03-31T13:35:09+5:302026-03-31T13:40:57+5:30
आदित्यकडून 'धुरंधर २'मध्ये एक चूक झाली होती. जी आता दुरुस्त करण्यात आली आहे.

'धुरंधर २'मध्ये होती मोठी चूक, ११ दिवसांनंतर आदित्य धरने सुधारली; तुमच्या आली होती का लक्षात?
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २'नं बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुरळा उडवून दिलाय. या सिनेमाची सध्या चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळतेय. सिनेमाचे जवळपास सर्व शो हाऊसफुल्ल सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. दररोज हा सिनेमा कमाईचे नवनवे उच्चांक गाठतोय. 'धुरंधर' पासूनच दिग्दर्शक आदित्य धरवर कौतुकाचा वर्षाव होतोय, त्याचं डिरेक्शन, स्क्रिप्ट आणि डिटेलिंगचे सारेच फॅन झाले. परंतु एका छोट्या चुकीमुळे सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला. आदित्यकडून 'धुरंधर २'मध्ये एक चूक झाली होती. जी आता दुरुस्त करण्यात आली आहे.
एका चाहत्याने हमजा आणि गुरबाज सिंग (पिंडा) यांच्यातील फाईट सीनचा एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये एक कॅमेरामन आरशात क्षणभर दिसत आहे. आदित्य धरने आता हा व्हिडीओ संपादित केला असून, त्याची नवीन आवृत्ती आता प्रदर्शित होत आहे. 'बॉलिवूड हंगामा'नुसार, "चित्रपटाच्या सुधारित प्रती देशभरातील चित्रपटगृहांमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. काही चित्रपटगृहांना शनिवारी, तर इतरांना रविवारी नवीन प्रिंट मिळाली. या नवीन प्रिंटमध्ये, आरशात कॅमेरामॅन दिसत नाही".
'धुरंधर २'ची स्टार कास्ट
पाकिस्तानात जाऊन राहिलेल्या आणि तिथल्या दहशतवादी कारवायांची माहिती भारताला गुप्त पद्धतीने देणाऱ्या भारतीय गुप्तहेराची कहाणी 'धुरंधर' मध्ये दाखवण्यात आली होती. याच सिनेमाचा 'धुरंधर २' हा सीक्वल आहे. या सिनेमात रणवीर सिंग, संजय दत्त, सारा अर्जुन, आर माधवन, राकेश बेदी, अर्जुन रामपाल यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमात झळकलेल्या सर्वच स्टार कास्टचं भरभरुन कौतुक केलं जातंय. संपूर्ण कास्टच्या अभिनयावर सारेच फिदा झालेत.