अशी सुरु झालेली आदित्य धर-यामी गौतमची लव्हस्टोरी, 'त्या' एका गोष्टीवर अभिनेत्रीचं भाळलं मन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 18:21 IST2025-11-18T18:20:10+5:302025-11-18T18:21:33+5:30
बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य धर आणि अभिनेत्री यामी गौतम यांच्या लग्नाला चार वर्ष झाली आहेत.

अशी सुरु झालेली आदित्य धर-यामी गौतमची लव्हस्टोरी, 'त्या' एका गोष्टीवर अभिनेत्रीचं भाळलं मन
बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य धर आणि अभिनेत्री यामी गौतम यांच्या लग्नाला चार वर्ष झाली आहेत. २०२१ साली त्यांनी कोव्हिड काळात अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत साधेपणाने लग्न केलं. हिमाचल प्रदेश येथे पारंपरिक पद्धतीने त्यांचा लग्नसोहळा पार पडला. आदित्य आणि यामी यांची लव्हस्टोरी नक्की कशी सुरु झाली होती माहितीये का?
आदित्य धर दिग्दर्शित 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' सिनेमात यामी गौतमने भूमिका साकारली होती. सिनेमाच्या प्रमोशनवेळी दोघांमध्ये मैत्री झाली. त्यांच्यात बोलणं होऊ लागलं. आदित्य धर एका मुलाखतीत म्हणाला होता की, "आमच्या दोघांमध्ये उरीच्या प्रमोशनवेळीच जास्त बोलणं सुरु झालं. एकमेकांची आवड निवड कळाली. आम्ही अगदीच एकमेकांसारखे आहोत हे वाटू लागलं. तिथूनच लव्हस्टोरी सुरु झाली."
तर यामी गौतम मुलाखतीत म्हणाली होती की, "हो, उरीच्या प्रमोशनवेळी आमच्यात आधी मैत्री झाली आणि मग प्रेमात रुपांतर झालं. मी त्या काळाला डेटिंग असं म्हणणार नाही पण आम्ही एकमेकांशी नियमित बोलायला लागलो होतो. आम्ही दोघंही वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवणारे लोक आहोत. त्यामुळे आमचं छान जमून आलं. तसंच आदित्यच्या एका कृतीने त्याने माझं मन जिंकलं होतं. एकदा सेटवर एक क्रू मेंबर जमिनीवर बसला होता. तर आदित्य खुर्चीवर होता. तो लगेच उठला आणि त्याने क्रू मेंबरला खुर्चीवर बसवलं. ही गोष्ट ऐकायला कितीही साधी, छोटी वाटत असली तरी यातूनच माणूस म्हणून तुम्ही कसे आहात हे कळतं. त्याने कधीच मला प्रपोज वगैरे केलं नाही. त्याच्या साधेपणाचा मी आदर करते आणि त्यावरच मी भाळले. तसंच आमच्यात बरंच साम्य आहे. आम्हाला दोघांना पार्टी करणं, जास्त सोशल होणं आवडत नाही. शांत घरी एकमेकांसोबत वेळ घालवणंच आम्ही पसंत करतो."