अभिनेत्री सोनमने या दिग्दर्शकासोबत केले होते लग्न, गेल्या वर्षी घेतला घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 18:21 IST2018-09-03T18:06:58+5:302018-09-03T18:21:27+5:30
सोनमचे खरे नाव बख्तावर खान असून तिने सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी तिचे नाव बदलले होते. तिने विजय या यशराज बॅनरच्या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली.

अभिनेत्री सोनमने या दिग्दर्शकासोबत केले होते लग्न, गेल्या वर्षी घेतला घटस्फोट
केवळ 16 वर्षांची असताना सोनमने बॉलिवूडमधील तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने तिच्या सहा वर्षांच्या करियरमध्ये जवळजवळ 30 चित्रपटांमध्ये काम केले. तिने अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड दृश्य दिले. त्यामुळे एक बोल्ड अभिनेत्री अशीच तिची ओळख होती. काही चित्रपटांमध्ये तर ती केवळ काही दृश्यांसाठी अथवा नृत्यासाठीच असायची. या बोल्ड अंदाजामुळेच तिला चांगली प्रसिद्धी मिळाली होती.
सोनमचे खरे नाव बख्तावर खान असून तिने सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी तिचे नाव बदलले होते. तिने विजय या यशराज बॅनरच्या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली. पहिल्या चित्रपटात तिला अनिल कपूर, ऋषी कपूर, मिनाक्षी शेषांद्री, राजेश खन्ना, हेमा मालिनी यांसारख्या दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळाली. तसेच यश राज सारखा बॅनर मिळाला. या नंतर तिला एकामागोमाग एक चित्रपटांच्या ऑफर्स येतच राहिल्या. त्रिदेव या चित्रपटात तर ती नसिरुद्दीन शहा यांच्या नायिकेच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाच्या वेळी तिचे वय 17 तर नसिरुद्दीन हे 38 वर्षांचे होते. तिने अनेक चित्रपटात आपल्या पेक्षा वयाने मोठ्या असलेल्या नायकासोबत काम केले.
सोनमने काहीच वर्षांत बॉलिवूडमध्ये आपली एक जागा निर्माण केली होती. पण प्रसिद्धीझोतात असतानाच तिने बॉलिवूडला रामराम ठोकला. त्रिदेव या चित्रपटाचे दिग्दर्शन राजीव रायने केले होते. याच चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान ती आणि राजीव एकमेकांच्या प्रेमात पडले. तीन वर्षं नात्यात राहिल्यानंतर त्यांनी लग्न केले. लग्नाच्यावेळी सोनम केवळ 19 वर्षांची होती. सोनमने इतक्या लहान वयात लग्न केल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला होता. तिने लग्नानंतर चित्रपटात काम करण्याऐवजी कुटुंबाला प्राधान्य दिले. दहा वर्षं राजीव आणि तिचे नाते सुरळीत सुरू होते. ते दोघे भारत सोडून विदेशात राहात होते. पण नंतर त्यांच्यात काही वाद झाल्याने त्यांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला आणि लग्नाच्या 15 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांचा घटस्फोट गेल्याच वर्षी म्हणजे 2017 मध्ये झाला. घटस्फोटानंतर काहीच महिन्यांनंतर तिने मुरली पोडुवलशी लग्न केले.