अजय देवगणपेक्षाही खतरनाक! विकी कौशलच्या 'तौबा तौबा' गाण्यावर काजोलने केला डान्स, सर्वांची हसून पुरेवाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 11:27 IST2025-11-17T11:25:44+5:302025-11-17T11:27:45+5:30
काजोल विकी कौशलच्या तौबा तौबा गाण्यावर अशी काही नाचलीये, की सर्व तिच्यापासून दूर पळाले. बातमीवर क्लिक करुन व्हिडीओ बघाच

अजय देवगणपेक्षाही खतरनाक! विकी कौशलच्या 'तौबा तौबा' गाण्यावर काजोलने केला डान्स, सर्वांची हसून पुरेवाट
अभिनेता अजय देवगण त्याच्या अतरंगी डान्स स्टेप्ससाठी ओळखला जातो. अजयला डान्स करता येत नसला तरीही त्याच्या हुक स्टेप्स चांगल्या गाजतात. अशातच अजयची पत्नी अभिनेत्री काजोल सध्या तिच्या अतरंगी डान्समुळे चर्चेत आली. त्यामुळे अजय देवगणाला स्पर्धा देणारी कोणीतरी व्यक्ती आहे, अशा विनोदी कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. नुकतंच काजोलनेविकी कौशलच्या गाजलेल्या 'तौबा तौबा' गाण्यावर केलेला डान्स बघून सर्वांची हसून पुरेवाट झाली आहे.
काजोलचा डान्स गाजला, सर्व हसले
काजोल आणि ट्विंकल खन्ना यांचा 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल' हा शो चांगलाच चर्चेत आहे. या शोच्या एका नवीन एपिसोडमध्ये काजोलने अभिनेता विकी कौशलच्या 'तौबा तौबा' डान्सवर नाचण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला आहे की, तिच्या चाहत्यांनी तिची तुलना थेट तिचा पती अभिनेता अजय देवगण याच्यासोबत केली आहे.
'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल' या शोच्या नवीन एपिसोडमध्ये विकी कौशल आणि क्रिती सनॉन हे विशेष पाहुणे म्हणून आले होते. याच दरम्यान, 'बॅड न्यूज' फेम अभिनेता विकी कौशलने काजोल आणि ट्विंकलला 'तौबा तौबा' या व्हायरल गाण्याच्या डान्स स्टेप्स शिकवण्याचा निर्णय घेतला. काजोलने सुरुवातीला विकीला फॉलो केलं. पण नंतर मात्र तिने स्वतःचाच वेगळा डान्स केला. जो पाहून स्टुडिओमधील सगळेजण हसून लोटपोट झाले. इतकंच नव्हे काजोलला असं नाचताना पाहून ट्विंकल आणि क्रिती दूर पळाल्या.
अजय देवगणशी तुलना
हा डान्स पाहिल्यानंतर विकी कौशलने थट्टा करत म्हटले, "ती अगदी अजय सरांसारखी ॲक्शनमध्ये दिसत आहे, हे स्टेप्स एखाद्या स्टंट दिग्दर्शकाने कोरियोग्राफ केले आहेत." तिच्या डान्सवर प्रतिक्रिया देताना चाहतेही खूप खुश झाले. एका चाहत्याने 'हा हा... काजोल काय करत आहे? तौबा तौबा!' अशी प्रतिक्रिया दिली, तर दुसऱ्याने, 'काजोल कधीच निराश करत नाही,' असे म्हटले. काही नेटकऱ्यांनी तर "अजय देवगणपेक्षा हा डान्स चांगला आहे," असे मिश्कील भाष्यही केले.