एकेकाळी कपड्याच्या कारखान्यात काम करणारा 'तो' आज आहे मोठा सुपरस्टार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 17:25 IST2020-07-16T17:24:47+5:302020-07-16T17:25:17+5:30
२००१ साली रिलीज झालेला ‘नंदा’ हा सिनेमा सूर्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. या सिनेमातील भूमिकेसाठी त्याला तामिळनाडू सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने गौरवण्यात आले.

एकेकाळी कपड्याच्या कारखान्यात काम करणारा 'तो' आज आहे मोठा सुपरस्टार ?
दक्षिणेचा सुपरस्टार अभिनेता सूर्या हा प्रसिद्ध अभिनेता शिवकुमार यांचा लेक. मात्र तरीही सूर्याने मेहनतीच्या जोरावर स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. सूर्याला सिनेमात फारसा रस नव्हता. त्यामुळेच त्याने कपड्याच्या कारखान्यात काम करण्यास सुरुवात केली. हे काम करताना सूर्याने तो अभिनेता शिवकुमार यांचा लेक ही त्याची ओळख सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. जवळपास ८ महिने त्याने या कपड्याच्या कारखान्यात काम केले. या कामाचा मोबदला म्हणून त्याला प्रतिमहिना हजार रुपये मजुरी मिळायची. सूर्याला वयाच्या २०व्या वर्षी सिनेमाचा ब्रेक मिळाला. १९९५ साली ‘असाई’ या सिनेमात सूर्याला प्रमुख अभिनेत्याची भूमिका मिळाली. मात्र सिनेमात सूर्याला विशेष आवड नव्हती त्यामुळे त्याने ती ऑफर धुडकावून लावली.
यानंतर जवळपास २ वर्षानंतर दिग्दर्शक वसंत यांच्या नेररुक्कू नेर या सिनेमा सूर्याला मिळाला. या सिनेमाचे निर्माते मणिरत्नम होेते. या सिनेमाला सूर्या काही नकार देऊ शकला नाही आणि दक्षिणेच्या सिनेसृष्टीत त्याने पहिलं पाऊल ठेवलं. दक्षिणेचा सुपरस्टार बनण्यासाठी सूर्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. सुरुवातीच्या दिवसांत काम करताना सूर्याला ब-याच अडचणींचा सामना करावा लागला. फायटिंग, डान्स आणि आत्मविश्वासाची कमी यामुळे सूर्याला एखादा सीन शूट करताना बराच त्रास व्हायचा. त्यावेळी सूर्याचे गुरु रघुवरन यांनी या कठीणप्रसंगी त्याला मदत केली.
वडिलांपेक्षा स्वतःची वेगळी ओळख कशी निर्माण करता येईल यासाठी रघुवरन यांनी सूर्याला मार्गदर्शन केलं. २००१ साली रिलीज झालेला ‘नंदा’ हा सिनेमा सूर्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. या सिनेमातील भूमिकेसाठी त्याला तामिळनाडू सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने गौरवण्यात आले. २०१० सूर्याने ‘रक्त चरित्र’ या सिनेमात काम केले. यातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. सूर्या सध्या सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. एका सिनेमासाठी सूर्या तब्बल २० ते २५ कोटी रुपयेमानधन घेतो. शिवाय सिनेमाच्या वितरण हक्काचेही तो वेगळे पैसे आकारतो.