कॅमेरामन म्हणाला, पनौती आहेस; सर्व हसले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 11:41 IST2024-12-22T11:40:09+5:302024-12-22T11:41:40+5:30
तुमच्या प्रयोगाला एकच प्रेक्षक असेल तरीही त्याच मेहनतीने काम करा - श्रेयस तळपदे

कॅमेरामन म्हणाला, पनौती आहेस; सर्व हसले अन्...
माझ्या आयुष्यातील एक ऑडिशन अशी आहे, जी मी कधीच विसरू शकणार नाही. माझ्या करिअरमध्ये काहीच घडत नव्हते. तेव्हा मी प्रचंड निराशेत होतो. या संघर्षाच्या काळात एकदा एका मालिकेच्या ऑडिशनसाठी मला बोलावण्यात आले. खरेतर नाटक आणि टीव्ही मालिकांमुळे माझी बऱ्यापैकी ओळख झाली होती. तरीही मला ऑडिशनला बोलावले गेले. ही बाब मला पटतही नव्हती; पण मनाला समजावले की, 'ठीक आहे... सध्या आपले दिवस वाईट आहेत.' ऑडिशनला पोहोचलो. दोघांची ऑडिशन झाली होती. नेमका मी कॅमेऱ्यापुढे बोलणार अशात कॅमेरामनने मला थांबवलं आणि कॅमेऱ्यात बिघाड होऊन तो बंद झाल्याचे सांगितले, बराच वेळ झाला; पण कॅमेरा सुरू होईना. अखेर मला उद्या या, असे सांगण्यात आले. मी घरी निघालो. वाटेत एक संदेश आला की, तुम्ही परत या. मी पुन्हा पोहोचलो. मी कॅमेऱ्यापुढे बोलणार तोच कॅमेरा बंद झाला. कॅमेरामन म्हणाला, 'तू पनौती है रे...' सर्वजण हसले अन् मी निघून आलो.
दिवस वाईट होते. तेव्हा नशीबही साथ देत नव्हते. हताश झालो; पण एक गोष्ट खरी होती की, प्रत्येक काळोखानंतर पहाटेचा जन्म होत असतो. आणि झालेही तसेच. पुढे मला एक चित्रपट मिळाला आणि ज्याने आयुष्य बदललं अन् मला नवी ओळख मिळाली.
झाडलोट करायचो, लादी पुसायचो
मी नाटकाशी एवढा एकरूप झालो होतो की, कॉलेजमध्ये सकाळी सातला पहिले लेक्चर असायचे. मी ड्रामा रूममध्ये येऊन झाडलोट करायचो. लादी पुसायचो. ती रूम माझ्यासाठी मंदिरासारखी होती.
आई म्हणे, बँकेत नोकरी कर माझा नाटकाशी परिचय हा शाळेच्या शेवटच्या दिवसात झाला. आठव्या वर्गात असताना मी एका नाटकात सीतेची भूमिका केली होती. पुढे महाविद्यालयीन जीवनात मी नाटकात पूर्णपणे बुडून गेलो अन् ठरवून टाकलं की, आता सर्व दरवाजे बंद, करिअर करायचं ते नाटकातच; पण आईचा त्यास विरोध होता. मी बँकेत नोकरी करावी असे तिला वाटत होते. मी बँकेच्या परीक्षाही दिल्या; पण 'सुदैवाने' पास झालो नाही.
कष्टांवर विश्वास ठेवा
तुमच्या कामाशी सदैव प्रामाणिक राहा. तुमच्या प्रयोगाला एकच प्रेक्षक असेल तरीही त्याच मेहनतीने काम करा.
प्रत्येक लहान संधीला मोठ्या संधीसारखं स्वीकारा.
नकार पचवायला शिका, निराश होऊ नका.
हार न मानता शिकण्याची तयारी ठेवा.
कष्टांवर विश्वास ठेवला, तर काहीही अशक्य नाही.
(संकलन : महेश घोराळे)