"जास्त मानधन घेणारा 'स्टार' नाही", प्रसिद्ध अभिनेता स्पष्टच बोलला; १० वर्षांनंतर करतोय कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 15:47 IST2026-02-02T15:46:40+5:302026-02-02T15:47:09+5:30
स्टार अभिनेत्याचा भाचा, स्टारडमच्या विरोधात केलं भाष्य

"जास्त मानधन घेणारा 'स्टार' नाही", प्रसिद्ध अभिनेता स्पष्टच बोलला; १० वर्षांनंतर करतोय कमबॅक
बीटाऊनमध्ये कलाकारांच्या मानधनाची नेहमीच चर्चा असते. आजकाल मोठे स्टार्स तर अव्वाच्या सव्वा मानधन आकारतात. आधी बजेटनुसार कलाकारांचं मानधन ठरायचं. पण आता मानधनावरुन बजेट ठरत आहे. त्यातच मोठा स्टार असेल तर आज तो १०० कोटींच्या घरातही मानधन घेत आहे. नुकतंच एका अभिनेत्याने या सिस्टीमवर नाराजी व्यक्त केली आहे.
बऱ्याच वर्षांनी पुन्हा स्क्रीनवर आलेला आमिर खानचा भाचा इमरान खान सध्या चर्चेत आहे. 'हॅपी पटेल' सिनेमात तो दिसत आहे. ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत इमरान खान म्हणाला, "जर मला दिसतंय की माझा सिनेमा बनवण्यासाठी मला ३० कोटी रुपये लागणार आहे तर ती तुमची प्रोडक्शन कॉस्ट असते. आणि त्यात जर मी म्हटलं की मी ४० कोटी मानधन घेईन तर सिनेमाचं बजेट ७० कोटी होईल."
तो पुढे म्हणाला, "आता नफा कमावण्याचा मार्ग कोणता राहिला? मला याची पर्वा आहे का? मी खरं तर याचा विचार करायला हवा. हा माझा सिनेमा आहे. मला वाटतं की या सिनेमात चांगला सिनेमा बनण्याची क्षमता आहे म्हणून सुरुवातीलाच कमी मानधन घ्या. नशीब आजमावून बघा. जर कोणी असं केलं तर तो खरा स्टार."
"मामा आमिर खानचीही हीच पद्धत आहे. त्यांनी कधीच अॅडव्हान्स फी नाही घेतली. ते कधीच ६० कोटी किंवा ७५ कोटी मानधन घेत नाहीत. हा वेडेपणा आहे. तुम्ही तुमच्याच सिनेमाला नुकसान पोहोचवता. स्वत:च्याच सिनेमाचा फायदा घेता आणि सिनेमाच्या किंमतीवर स्वत: श्रीमंत होता. याचा अर्थ तुमचा सिनेमावर विश्वासच नाही असाही होतो", असंही तो म्हणाला.