Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 08:49 IST2025-11-12T08:48:34+5:302025-11-12T08:49:09+5:30
Dharmendra Discharged from Hospital : धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. धर्मेंद्र यांच्याबाबत चुकीच्या बातम्या पसरल्याने चाहत्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर कुटुंबीयांकडून धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगत ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचं निवेदन देण्यात आलं होतं. आता धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
उपचारादरम्यान धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत चाहत्यांना चिंता सतावत होती. पण, आता धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारली आहे. त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, धर्मेंद्र यांना बुधवारी(१२ नोव्हेंबर) सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सकाळी बॉबी देओल आणि सनी देओल त्यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले होते. तेव्हा धर्मेंद्र यांना डिस्चार्ज देण्यात आला. "धर्मेंद्र यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना घरी नेऊन त्यांच्यावर आता पुढील उपचार करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे", असं डॉक्टर प्रतित सामदानी यांनी पीटीआयला सांगितलं.
धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक असताना शाहरुख खान, सलमान खान, अमिषा पटेलसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांना भेटण्यासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात हजेरी लावली होती. वडिलांच्या तब्येतीबाबत कळताच ईशा देओलही ताबोडतोब अमेरिकेतून मुंबईत आली. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देशभरातून त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत.