'मीटू'च्या आरोपांनंतर कुठे गायब आहेत आलोकनाथ? मित्राचा खुलासा; म्हणाले, "त्याच्याकडून चूक झाली..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 13:14 IST2026-01-13T13:13:55+5:302026-01-13T13:14:34+5:30
उगाच आरोप झालेले नाहीत, त्याने नक्कीच..., आलोक नाथ यांच्या मित्राने केला खुलासा

'मीटू'च्या आरोपांनंतर कुठे गायब आहेत आलोकनाथ? मित्राचा खुलासा; म्हणाले, "त्याच्याकडून चूक झाली..."
अनेक हिंदी सिनेमांमध्ये 'संस्कारी बाबूजी' अशी ओळख असलेले अभिनेते आलोक नाथ आता कुठे गायब आहेत असाच प्रश्न अनेकांना पडला असेल. काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर मी टू चे आरोप लागले आणि ते स्क्रीनवरुन गायबच झाले. ना कोणत्या इव्हेंटला ना कुठे पार्टीत ते दिसले. आलोक नाथ आता प्रसिद्धीझोतापासून दूर एकाकी आयुष्य जगत असल्याचा खुलासा त्यांचे मित्र अभिनेते राजेश पुरी यांनी केला आहे.
सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत राजेश पुरी म्हणाले, "मी आणि आलोक ट्रेनने एकत्रच दिल्लीवरुन मुंबईत आलो होतो. तेव्हा आम्ही पायऱ्यांवर बसून करिअरचा विचार करायचो. आपल्याला कोणी ओळखत नाही, कसं करायचं? यावर आम्ही बोलायचो. चला बघता येईल असं म्हणत आम्ही चालायला लागायचो. आम्ही काही सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. यश मिळण्यापूर्वी आम्ही एकत्र होतो. एकत्रच हळू हळू पुढे जात होतो. आलोक चुकीचं काम करेल यावर माझा विश्वासच नाही."
बोलता बोलता राजेश पुरी यांनी आलोक यांच्याकडून काही चुका झाल्या हे मान्यही केलं. ते म्हणाले, "आलोक खूप साफ मनाचा माणूस आहे. त्याची दोन रुपं होती. एक म्हणजे तो खूप प्रेमळ माणूस आहे. पण त्याला चुकीच्या गोष्टी सहन होत नाहीच. दुसरं म्हणजे नशा. तो खूप वाईट पद्धतीने दारु प्यायचा. याचाच काहीसा परिणाम त्याच्यावर झाला. आता तो दारु पीत नाही. अधून मधून माझं त्याच्याशी बोलणं होतं. मी आजही हेच सांगतो की तो माणूस म्हणून खूप चांगला आहे."
"आलोक नाथवर आरोप झाले तेव्हा मी प्रत्येक वेळी त्याच्यासोबत नव्हतो. तो अनेक सिनेमांमध्ये काम करत होता. त्याच्यावर झालेल्या आरोपांबद्दल मी त्याला कधी विचारलं नाही. ते सगळं माझ्यासमोर घडलं नाही. त्याच्यावर जे आरोप झाले त्यात बऱ्याचदा तो आउटडोअर शूटचाच उल्लेख होता. असं सगळं बऱ्याचदा आउटडोअरलाच होतं. इथे तर होत नाही. जेव्हा मी आलोकबरोबर आउटडोअर काम केलं तेव्हा तर मी त्याला असं पाहिलं नव्हतं. तसंच मी लग्न झाल्यानंतर पत्नीसोबत बिझी असायचो. कदाचित म्हणून तो माझ्यासोबत असताना थोडा सांभाळून राहायचा. मी कधी त्याला गैरवर्तन करताना पाहिलं नाही. पण हो, दारु प्यायल्यानंतर तो जास्त आक्रमक व्हायचा जे की चांगलं नव्हतं. मला जे आवडायचं नाही ते मी त्याला सरळ सांगायचो."
"मी त्याला आता कितीदा तरी घरी बोलावलं. भेटू म्हटलं. आमच्या फार्म हाउसवर बोलवलं. तो फक्त हो हो करुन टाळतो. बोलणं होतं तेव्हा चांगल्या गप्पा मारतो. पण आपण एक चांगलं टॅलेंट मिस करतोय याची खंत मला कायम वाटते. आलोकला आजही ऑफर येतात पण तो स्वीकारत नाही. त्याला काही विचारलं तर तो घरुन काम करतोय असं सांगतो. आता काय काम करतो हे मलाही माहित नाही. मला वाटतं सध्या त्याच्याकडे काम नाहीये. मी टू च्या आरोपांनंतर त्याला खूप जास्त दु:ख झालं आहे. त्याने काहीतरी केलं तर असणार उगाच त्याच्यावर आरोप लागले नसणार. पण नक्की कोणत्या हेतूने केलं, का केलं याचा त्याला पश्चाताप आहे. जे झालं ते वाईट झालं. त्याला आता कोणासमोरच यायचं नाही. माझ्याशीही फोनवरच बोलतो. भेटणार नाही असं म्हणत तर नाही पण ते समजतंच की हा काही भेटायला येणार नाही. त्याच्याकडून चुका झाल्या पण तो चांगला आहे. त्याची पत्नी चांगली आहे, मुलं गोड आहेत. आम्ही एका गुरुजींना मानतो. आलोकही आता त्यांना शरण गेला आहे. पण आता गुरुजींच्या सत्संगसाठी बोलवलं तर तो तिथेही आला नाही."