"आराध्याच्या आईने तिला...", घटस्फोटाच्या अफवांवर लेकीच्या प्रतिक्रियेबाबत स्पष्टच बोलला अभिषेक बच्चन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 14:18 IST2025-12-11T14:17:29+5:302025-12-11T14:18:13+5:30
बॉलिवूड कपल ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या अफवा कित्येक दिवसांपासून सुरू होत्या. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या घटस्फोटाच्या या अफवांना अखेर अभिषेक बच्चनने थेट भाष्य करत पूर्णविराम दिला आहे. याबरोबरच लेक आराध्याची याबाबत काय प्रतिक्रिया होती, याचा खुलासाही त्याने केला आहे.

"आराध्याच्या आईने तिला...", घटस्फोटाच्या अफवांवर लेकीच्या प्रतिक्रियेबाबत स्पष्टच बोलला अभिषेक बच्चन
बॉलिवूड कपल ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या अफवा कित्येक दिवसांपासून सुरू होत्या. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यात दुरावा आल्याचंही बोललं जात होतं. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या घटस्फोटाच्या या अफवांना अखेर अभिषेक बच्चनने थेट भाष्य करत पूर्णविराम दिला आहे. याबरोबरच लेक आराध्याची याबाबत काय प्रतिक्रिया होती, याचा खुलासाही त्याने केला आहे.
अभिषेक बच्चनने नुकतीच 'पीपिंग मून'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला, "ऐश्वर्याने आराध्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीबाबत आदरपूर्वक भावना निर्माण केली आहे. आम्ही दोघं काय काम करतो, हे ऐश्वर्याने तिला चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं आहे. आराध्या एक टीनेएजर आहे आणि तिचंदेखील एक मत असतं. तिचं कोणत्या बाबतीत वेगळं मत असेल तर आम्ही त्याबाबत चर्चा करतो. आराध्या तिच्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करते आहे. तिच्याजवळ मोबाईल नाही. ती फक्त १४ वर्षांची आहे. आराध्याशी कोणत्या मित्रमैत्रिणींना बोलायचं असेल तर ते ऐश्वर्याच्या फोनवर कॉल करतात. आम्ही खूप आधीच आराध्याबाबत हा निर्णय घेतला होता".
"आराध्या इंटरनेटचा वापर करते. पण, ती गुगलवर तिच्या शिक्षणासंदर्भात गोष्टी सर्च करते. त्यामुळे तिला आमच्या घटस्फोटाच्या अफवांबद्दल माहीत असेल असं मला वाटत नाही. तिला या सगळ्या गोष्टीत अजिबात रस नाही. तिच्या आईने तिला चांगल्या पद्धतीने समजावलं आहे की कुटुंबाबाबत सोशल मीडियात येणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या नाहीत", असंही अभिषेकने सांगितलं. अभिषेक आणि ऐश्वर्याने २००७ मध्ये लग्न करत संसार थाटला होता. त्यानंतर ४ वर्षांनी २०११ मध्ये ते आईबाबा झाले. त्यांना एक मुलगी असून तिचं नाव आराध्या आहे.