ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन, म्हणाला- "माझ्या पत्नीला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 13:36 IST2025-12-11T13:36:11+5:302025-12-11T13:36:49+5:30
अखेर इतक्या दिवसांनी अभिषेक बच्चनने घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे.

ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन, म्हणाला- "माझ्या पत्नीला..."
बॉलिवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल असलेले ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यात दुरावा आल्याचंही बोललं जात होतं. घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी थेट भाष्य करणं टाळलं होतं. पण, ते अनेक इव्हेंटमध्ये फॅमिलीसोबत एकत्र दिसले. त्यामुळे त्यांच्या नात्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. आता अखेर इतक्या दिवसांनी अभिषेक बच्चनने घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे.
अभिषेक बच्चनने नुकतीच 'पीपिंग मून'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या अफवांबाबत विचारण्यात आलं. यावर अभिषेकने कोणतेही आढेवेढे न घेता थेट उत्तर दिलं आहे. "लग्नाच्या आधी त्यांना आमचं लग्न कधी होणार हे जाणून घ्यायचं होतं. आता ते घटस्फोटाच्या चर्चा करत आहेत. माझ्या पत्नीला माझं सत्य माहीत आहे. मला तिच्याबद्दल माहीत आहे. आम्ही एक आनंदी आणि परिपूर्ण कुटुंब आहोत आणि आमच्यासाठी हेच महत्त्वाचं आहे".
"मी खूप नम्रतेने आणि सन्मानाने हे सांगू इच्छितो की मीडिया चुकीच्या गोष्टी पसरवते. मीडिया देशाचा आत्मा आहे. आजच्या जगात तुम्हाला सगळ्यात आधी न्यूज द्यायची असते. मी तुमच्यावर असलेला दबाव समजू शकतो. पण, तुम्ही हे सगळं कशासाठी करत आहात? तुम्ही एका व्यक्तीबद्दल बोलत आहात ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कुणाचा तरी नवरा, वडील असल्याच्या नात्याने मला काही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. जर तुम्ही माझ्या कुटुंबाबाबत चुकीचं बोललात तर तुम्हाला याचा सामना करावा लागेल. कारण, माझ्या कुटुंबाबाबत काहीही चुकीचं मी सहन करणार नाही", असंही अभिषेकने पुढे म्हटलं आहे.
अभिषेकच्या वक्तव्यानंतर आता त्याच्या ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याने २००७ मध्ये लग्न करत संसार थाटला होता. त्यानंतर ४ वर्षांनी २०११ मध्ये ते आईबाबा झाले. त्यांना एक मुलगी असून तिचं नाव आराध्या आहे.