अभिजित भट्टाचार्य अडचणीत, महात्मा गांधींबद्दल केलेलं 'ते' वादग्रस्त वक्तव्य भोवलं, माफी न मागितल्यास...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 11:43 IST2025-01-05T11:42:32+5:302025-01-05T11:43:44+5:30
अभिजित भट्टाचार्य यांनी माफी न मागितल्यास फौजदारी खटला सुरू केला जाईल.

अभिजित भट्टाचार्य अडचणीत, महात्मा गांधींबद्दल केलेलं 'ते' वादग्रस्त वक्तव्य भोवलं, माफी न मागितल्यास...
प्रसिद्ध गायक अभिजित भट्टाचार्य (Abhijeet Bhattacharya) यांनी एका मुलाखतीमध्ये "महात्मा गांधी हे भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते" असे वर्णन केले होते. त्यावरुन अभिजित भट्टाचार्य हे अडचणीत आले आहेत. याप्रकरणी त्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. अभिजित भट्टाचार्य यांच्याकडून लेखी माफीची मागणी करण्यात आली आहे. तसे न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
अभिजित भट्टाचार्य यांना मनीष देशपांडे आणि इतर कायद्याच्या विद्यार्थ्यांनी वकील असीम सरोदे (Asim Sarode) यांच्यामार्फत ही नोटीस पाठवली आहे. "गांधीजींनी हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी अथक प्रयत्न केले. जेव्हा स्वातंत्र्य चळवळीतील राजकीय परिस्थिती भारताचे दोन राष्ट्रांमध्ये विभाजन करण्याच्या मार्गावर होती, तेव्हा 'फाळणी माझ्या मृतदेहावरच मान्य करावी लागेल', असे ते म्हणाले होते गांधीजींना श्रद्धांजली म्हणून . 150 हून अधिक देशांनी टपाल तिकिटे जारी केली आहेत", असं नोटीसमध्ये म्हटलं आहे या नोटीसमध्ये लेखी माफी मागण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याने माफी न मागितल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असेही त्यात म्हटले आहे.
काय म्हणाले होते अभिजित भट्टाचार्य?
शुभांकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये अभिजीत भट्टाचार्य म्हणाले होते, "संगीतकार आरडी बर्मन हे महात्मा गांधींपेक्षा मोठे होते. ज्याप्रमाणे महात्मा गांधी राष्ट्रपिता होते, त्याचप्रमाणे आरडी बर्मन हे संगीत विश्वाचे राष्ट्रपिता होते. महात्मा गांधी हे भारतासाठी नव्हे, तर पाकिस्तानसाठी राष्ट्रपिता होते. भारत तर आधीपासूनच भारत होता. पाकिस्तान तयार करण्यात आला. चुकून महात्मा गांधींना येथील राष्ट्रपिता सांगण्यात आले. जन्मदाते तर तेच होते. पिताही ते होते. अजोबाही ते होते, सर्व काही तेच होते".