"तुमच्या मुलांची फी पण निर्माता भरेल का?", आमिरने सांगितले बॉलिवूड सेलिब्रिटींचे नखरे, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 12:48 IST2025-09-14T12:47:51+5:302025-09-14T12:48:39+5:30
काही सेलिब्रिटी त्यांच्या कामगारांचा खर्च निर्मात्यांना करायला लावत असल्याचं आमिरने म्हटलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बॉलिवूड स्टार्सचा खरा चेहरा समोर आणला आहे.

"तुमच्या मुलांची फी पण निर्माता भरेल का?", आमिरने सांगितले बॉलिवूड सेलिब्रिटींचे नखरे, म्हणाला...
बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या लाइफस्टाइलमुळे कायमच चर्चेत असतात. त्यांचं आरामदायी आणि लक्झरियस लाइफस्टाइल हा नेहमीच आकर्षणाचा आणि कुतुहलाचा विषय राहिलेला आहे. पण, याच बॉलिवूड स्टार्सवर आता आमिर खानने निशाणा साधत त्यांची पोलखोल केली आहे. काही सेलिब्रिटी त्यांच्या कामगारांचा खर्च निर्मात्यांना करायला लावत असल्याचं आमिरने म्हटलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बॉलिवूड स्टार्सचा खरा चेहरा समोर आणला आहे.
आमिर म्हणाला, "कलाकारांना ओळख मिळाली पाहिजे. पण, एवढीही नाही की ते निर्मात्यांसाठी डोकेदुखी ठरतील. एकेकाळी निर्मात्यांना सेलिब्रिटींचे ड्रायव्हर आणि त्यांच्या इतर कामगारांचा खर्च उचलावा लागत होता, अशी सिस्टीम होती. मला हे खूपच विचित्र वाटलं होतं. मला असं वाटायचं की ड्रायव्हर आणि कामगार माझ्यासाठी काम करायचे तर त्यांचा खर्च निर्मात्याने का उचलावा? जर निर्माता माझे वैयक्तिक खर्च उचलत असेल तर माझ्या मुलांची फीदेखील त्यानेच भरावी का?" निर्मात्याने केवळ कलाकारांचा सिनेमाशी निगडीत असलेला खर्च उचलला पाहिजे.
"आता तर हे अधिक गंभीर होत चाललं आहे. मी असं ऐकलंय की आजकाल सेलिब्रिटी त्यांच्या ड्रायव्हरचे पैसेही देण्याची तसदी घेत नाहीत. ते निर्मात्यांना त्याला पैसे द्यायला सांगतात. एवढंच नाही तर कलाकारांच्या स्पॉट बॉयचा खर्चही निर्माता उचलतो. सेटवरही सेलिब्रिटींचे वेगळे किचन असतात. त्याचेही पैसे निर्मात्याने भरावे अशी त्यांची अपेक्षा असते. किचन, जीम या गोष्टींसाठी ते व्हॅनिटी व्हॅनचीही मागणी करतात", असंही आमिरने सांगितलं.
"कलाकार कोटी रुपये कमावतात. तरीदेखील आपल्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत? मला हे विचित्र वाटतं. निर्मात्यांवर हा सगळा खर्च टाकल्याने इंडस्ट्रीचं नुकसान होत आहे. ही खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. सिनेमातील भूमिकेसाठी लागणाऱ्या ट्रेनिंगचा खर्च या गोष्टी ठीक आहेत. पण, याव्यतिरिक्त तुमच्या वैयक्तिक सोयी सुविधाचं निर्मात्यावर ओझं लादू नये. असंच चालू राहिलं तर कलाकार निर्मात्यांकडून त्यांच्या फ्लॅटचे हफ्ते भरण्याचीही अपेक्षा करू लागतील", असं म्हणत आमिरने सेलिब्रिटींचे कान टोचले आहेत.