लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 09:46 IST2025-06-15T09:45:06+5:302025-06-15T09:46:40+5:30

आमिरची पहिली पत्नी रीना दत्ता आणि दुसरी पत्नी किरण राव दोघीही हिंदू होत्या. तर आता गौरीही हिंदूच आहे. यामुळे अनेकदा आमिरवर लव जिहादचा आरोप करण्यात आला आहे.

Aamir Khan reacts to the accusation of love jihad says love is greater it should be honoured | लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."

लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."

'द परफेक्शनिस्ट' आमिर खान (Aamir Khan) सध्या सितारे जमीन पर सिनेमामुळे चर्चेत आहे. लाल सिंह चड्डाच्या अपयशानंतर त्याने कोणत्याही सिनेमात काम केलं नव्हतं. आता तो ३ वर्षांनी सिनेमात दिसणार आहे. शिवाय आमिर खान नुकताच ६० वर्षांचा झाला. या वयात त्याने तिसऱ्यांदा प्रेमात पडल्याची कबुली दिली. त्याने गौरी स्प्रॅटला डेट करत असल्याचा खुलासा केला. आमिरची पहिली पत्नी रीना दत्ता आणि दुसरी पत्नी किरण राव दोघीही हिंदू होत्या. तर आता गौरीही हिंदूच आहे. यामुळे अनेकदा आमिरवर लव जिहादचा आरोप करण्यात आला आहे. नुकतंच 'आप की अदालत' शोमध्ये आमिरने या आरोपावर उत्तर दिलं.

'तुम्ही लव जिहाद करता...'पीके' मध्ये तुम्ही हिंदू मुलीचं लग्न पाकिस्तानी मुसलमानसोबत लावणं योग्य आहे असं दाखवलं. यावर काय सांगशील? आमिर म्हणाला, "जेव्हा दोन धर्माचे लोक एकत्र येतात, त्यांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम असतं...तेव्हा प्रत्येक वेळी हे लव्ह जिहादच नसतं. दोन वेगवेगळ्या धर्माच्या लोकांचं मन कधीकधी एक होऊच शकतं. ही माणुसकीचीही गोष्ट आहे. प्रत्येक वेळी हे लव्ह जिहाद होऊ शकत नाही. जेव्हा मनाचं मिलन होतं तेव्हा ही गोष्ट धर्माच्याही वर असते." 

तो पुढे म्हणाला, "माझी बहीण निखतचं लग्न संतोष हेगडेसोबत झालं जो हिंदू आहे. त्याला तुम्ही लव जिहाद बोलणार? माझी छोटी बहीण फरनचं लग्न हिंदू मुलगा राजीव दत्तासोबत झालं. हे लव जिहाद आहे का? माझी मुलगी आयराचं लग्न हिंदू मुलगा नुपूरसोबत नुकतंच झालं. त्यामुळे प्रेम ही सर्वात मोठी गोष्ट आहे."

आमिर खानचा 'सितारे जमीन पर' २० जून रोजी रिलीज होत आहे. यामध्ये तो दिव्यांग मुलांच्या बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत आहे. जिनिलिया डिसुजा सिनेमात मुख्य अभिनेत्री आहे.

Web Title: Aamir Khan reacts to the accusation of love jihad says love is greater it should be honoured