"मी थोडा वेडा आहे.." आमिर खानने 'सितारे जमीन पर' रिमेक असण्याविषयी सोडलं मौन, दिलं सणसणीत उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:31 IST2025-06-05T12:31:01+5:302025-06-05T12:31:56+5:30
'सितारे जमीन पर' हा सिनेमा एका स्पॅनिश सिनेमाचा रिमेक आहे त्यामुळे आमिरला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. यावर आमिरने भाष्य करत रोखठोक उत्तर दिलंय

"मी थोडा वेडा आहे.." आमिर खानने 'सितारे जमीन पर' रिमेक असण्याविषयी सोडलं मौन, दिलं सणसणीत उत्तर
येत्या काहीच दिवसात आमिर खानची (aamir khan) प्रमुख भूमिका असलेला 'सितारे जमीन पर' (sitaare zameen par) सिनेमा रिलीज होणार आहे. आमिर खानच्या चाहत्यांना या सिनेमाची खूप उत्सुकता आहे. गेल्या २-३ वर्षांपासून आमिरने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला होता आणि त्याचा एकही सिनेमा रिलीज झाला नव्हता. याशिवाय आमिरचे आधीचे दोन्ही सिनेमे 'लाल सिंग चढ्ढा' आणि 'ठग्ज ऑफ हिंदुस्तान' फ्लॉप झाले. त्यामुळे 'सितारे जमीन पर' सिनेमाकडून सर्वांना आशा आहे. 'सितारे जमीन पर' हा एका स्पॅनिश सिनेमाचा रिमेक आहे. त्यामुळे आमिरला अनेकांनी ट्रोल केलं. अखेर नुकत्याच एका मुलाखतीत आमिरने ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे.
'सितारे जमीन पर'च्या रिमेकबद्दल आमिर काय म्हणाला?
'सितारे जमीन पर'च्या रिमेकबद्दल विचारलं असता आमिर खान म्हणाला, 'लाल सिंह चड्ढा' नंतर अनेक लोकांनी मला सांगितलं की, तू पुन्हा एकदा रिमेक करत आहेस. 'लाल सिंह...' बनवल्यानंतर माझ्यावर खूप ट्रोलिंग झाली होती, की मी रिमेक का केला. पण खरं सांगायचं तर, मी थोडा वेडसर माणूस आहे, मला प्रॅक्टिकल गोष्टी फारश्या कळत नाहीत. "
"मला रिमेक करण्यात काहीच अडचण वाटत नाही. यामुळे माझी क्रिएटिव्हिटी कमी होते, असंही मला वाटत नाही. कारण मी स्वतःसाठी नवीनच काम करत असतो. ही गोष्ट कुणी तरी दुसऱ्याने तयार केली असली, तरी मी माझ्या दृष्टीकोनातून ती गोष्ट नव्याने मांडतोय."
"शेक्सपिअरचं एखादं नाटक मी पुन्हा करत असलो, तरी त्यात मी माझं काहीतरी योगदान देतो. त्यामुळे रिमेकवर होणारी ही चर्चा मला अगदीच निरर्थक वाटते. मी त्यावर विश्वास ठेवत नाही. उदाहरणार्थ, मी 'गजनी' केला तेव्हा तो चित्रपट आधीच तामिळमध्ये मुरुगादासने बनवला होता. पण मी तो माझ्या दृष्टीकोनातून पुन्हा तयार केला. माझ्या प्रेक्षकांसाठी, मी माझी ऊर्जा त्यात घालतो आणि त्यांना काहीतरी वेगळं दाखवतो. त्यामुळे मला वाटतं, माझं काम वेगळं आहे." अशाप्रकारे आमिरने रिमेकवर भाष्य केलं. 'सितारे जमीन पर' सिनेमा २० जून रोजी सगळीकडे रिलीज होणार आहे.