सलमान खान सांगतोय, लग्न करण्यासाठी हेच वय योग्य... करणार का तितक्या वर्षांचा झाल्यावर लग्न?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 16:50 IST2019-06-14T16:48:35+5:302019-06-14T16:50:24+5:30
सलमानला बॉलिवूडमधील मोस्ट एलिजेबल बॅचलर मानले जाते.

सलमान खान सांगतोय, लग्न करण्यासाठी हेच वय योग्य... करणार का तितक्या वर्षांचा झाल्यावर लग्न?
सलमान खान आणि कतरिना कैफची मुख्य भूमिका असलेला भारत हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाची कथा तर प्रेक्षकांना आवडत आहे. पण त्याचसोबत या चित्रपटात सलमान आणि कतरिना यांनी खूप चांगला अभिनय केला असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. तसेच या चित्रपटातील सलमान आणि कतरिनाच्या केमिस्ट्रीची देखील चांगलीच चर्चा रंगली आहे. सलमानच्या या चित्रपटाने आतापर्यंत १५० कोटीहून अधिक रक्कम बॉक्स ऑफिसवर कमावली आहे.
सलमान खानचे फॅन फॉलोव्हिंग हे प्रचंड आहे आणि त्यातही त्याच्या महिला चाहत्यांची संख्या ही अधिक आहे. सलमानला बॉलिवूडमधील मोस्ट एलिजेबल बॅचलर मानले जाते. त्यामुळे तो लग्न कधी करणार असा प्रश्न त्याला नेहमीच मुलाखतींमध्ये विचारला जातो आणि सलमान देखील या प्रश्नाला मजेशीररित्या उत्तरं देत असतो. सलमान खान लग्न कधी करणार हा एक जागतिक प्रश्न बनला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.
सलमानने एबीपी माझाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लग्नाविषयी भाष्य केले आहे. भारत या चित्रपटात भारत या व्यक्तिरेखेच्या आयुष्यातील विविध टप्पे दाखवण्यात आले आहेत. या चित्रपटात तो सत्तरी पार केलेल्या म्हाताऱ्याच्या भूमिकेत देखील दिसला आहे. याच चित्रपटाचा संदर्भ घेत लग्न करण्यासाठी योग्य वय ७२ असते असे सलमानने म्हटले आहे.
सलमानला लग्नाबाबत काही दिवसांपूर्वी देखील विचारण्यात आले होते. त्यावर बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सलमानने सांगितले होते की, माझा लग्न संस्थेवर विश्वासच नाहीये. जोडीदार असावा असे मी मानतो. पण लग्नावर माझा विश्वास नाहीये.
तसेच याआधीच्या एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की, माझ्या लग्नाबाबात खूप साऱ्या लोकांना चिंता लागलेली आहे याचा मला प्रचंड आनंद होतो. पण मी लग्न केल्यास यांना काय फायदा होणार हेच मला कळत नाही. लग्न कधी होणार तेव्हा होणार... होणार नसेल तर ते होणार नाही.