National Award: '12th Fail' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा! तर विक्रांत मेस्सीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 18:36 IST2025-09-23T18:34:04+5:302025-09-23T18:36:38+5:30
‘12th फेल’साठी विक्रांत मेस्सीला पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराचा बहुमान, राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष सन्मान

National Award: '12th Fail' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा! तर विक्रांत मेस्सीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
71st national film awards : नुकताच ७१ वा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीला ‘12th फेल’ या चित्रपटामधील आपल्या जबरदस्त अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावून भारतीय सिनेसृष्टीत आपले नाव सुवर्णअक्षरांनी कोरले आहे. आज २३ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीतील विज्ञान भवनात अभिनेत्याला गौरविण्यात आलं. संवेदनशील अभिनय आणि भूमिकांमधील सखोलतेसाठी ओळखला जाणारा विक्रांत आता या पिढीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानला जात आहे.
‘12th फेल’ ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा!
‘12th फेल’ या चित्रपटात विक्रांतने मनोज कुमार शर्मा यांची भूमिका साकारली आहे . एक अशा तरुणाची कथा, जो प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आयपीएस अधिकारी बनतो. विक्रांतचा अभिनय या चित्रपटात केवळ हृदयाला भिडणारा नव्हता, तर प्रेरणादायकही होता.या भूमिकेमुळे त्याला मिळालेलं राष्ट्रीय पारितोषिक हे यंदाच्या सर्वात योग्य आणि सन्माननीय विजयांपैकी एक मानलं जात आहे.विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटाने दोन्ही कॅटेगरीमध्ये हा अवॉर्ड मिळवला आहे.
चित्रपटात त्याने साकारलेली परफॉर्मन्स इतकी जिवंत आणि प्रामाणिक होती की प्रेक्षक केवळ शर्मा यांच्या संघर्षाशी जोडले गेले नाहीत, तर तो संघर्ष त्यांनी अनुभवला. विक्रांतच्या अभिनयाने संपूर्ण कथेला वेगळ्याच उंचीवर नेलं आणि त्याला या पिढीतील अत्यंत प्रतिभावान आणि समर्पित अभिनेत्यांपैकी एक म्हणून सिद्ध केलं.
विक्रांतसाठी हा पुरस्कार केवळ वैयक्तिक यश नाही, तर त्यांनी साकारलेल्या त्या जीवनकथेप्रती एक प्रकारची श्रद्धांजली आहे. ‘12th फेल’ ही केवळ एक फिल्म नव्हती, ती एक चळवळ बनली. जिच्याशी हजारो विद्यार्थी, स्वप्न पाहणारे तरुण आणि सामान्य लोक स्वतःला जोडून पाहू लागले. सध्या अभिनेत्यावर मनोरंजनविश्वातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.टेलिव्हिजनपासून राष्ट्रीय पुरस्कार विजेता होण्यापर्यंतचा विक्रांतचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.