'गदर'नंतर कोणत्याच सिनेमाला जमलं नाही, '12th फेल'ने करुन दाखवलं! रचला इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 17:51 IST2024-04-12T17:50:39+5:302024-04-12T17:51:09+5:30
२३ वर्षांपूर्वी आलेल्या सनी देओलच्या 'गदर' सिनेमाने एक रेकॉर्ड केला होता.

'गदर'नंतर कोणत्याच सिनेमाला जमलं नाही, '12th फेल'ने करुन दाखवलं! रचला इतिहास
विधु विनोद चोप्रा यांच्या 12th फेल सिनेमाची पुन्हा चर्चा आहे. बॉलिवूडमध्ये तब्बल २३ वर्षांनी हा इतिहास पुन्हा घडला आहे. होय २३ वर्षांपूर्वी आलेल्या सनी देओलच्या 'गदर' सिनेमाने एक रेकॉर्ड केला होता. त्यानंतर कोणत्याच सिनेमाला तो रेकॉर्ड मोडता आला नव्हता. पण विधु विनोद चोप्रा आणि विक्रांत मेस्सीने (Vikrant Massey) ते करुन दाखवलंय. कोणता आहे तो रेकॉर्ड?
12th फेल सिनेमा २७ ऑक्टोबर २०२३ रोजी रिलीज झाला होता. २० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाचं खूप कौतुक झालं. विक्रांत मेस्सी आणि मेधा शंकर यांनी सिनेमात मुख्य भूमिका साकारली. IPS मनोज शर्मा यांच्या आयुष्यावर सिनेमाची कहाणी आधारित होती. ही प्रेरणादायक कहाणी पाहून प्रेक्षकही भारावले. नुकतंच सिनेमाने थिएटरमध्ये २५ आठवडे पूर्ण केले आहेत. होय सिनेमाने सिल्वर ज्युबिली साजरी करत आहे. गेल्या २३ वर्षात एकही सिनेमा सलग २५ आठवडे तग धरुन राहिलेला नाही. त्यामुळे शाहरुख-सलमान असो किंवा कार्तिक आर्यन, वरुण धवन या नव्या पिढीतील स्टार्स असो कोणालाच हे जमलेलं नव्हतं ते विक्रांत मेस्सीने करुन दाखवलं. सुंदर स्क्रीप्ट, अप्रतिम अभिनय, उत्कृष्ट दिग्दर्शनाच्या जोरावर सिनेमा २५ आठवड्यांनंतरही थिएटरमध्ये टिकून आहे.
विक्रांतने पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. तर इतर कलाकार आणि चाहत्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय. हा सिनेमा आणि विक्रांत यासाठी नक्कीच पात्र असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली.
२३ वर्षांपूर्वी सनी देओलच्या 'गदर:एक प्रेम कथा'ने सिल्वर जुबिली साजरी केली होती. त्यानंतर असा चित्रपट झालाच नाही जो इतका काळ थिएटरमध्ये टिकून राहील. २३ वर्षांनंतर 12TH फेलने ती जादू केली.